Tue, Jul 23, 2019 04:12होमपेज › Belgaon › सीमाभागातून होणारा दूधपुरवठा उद्यापासून बंद करा

सीमाभागातून होणारा दूधपुरवठा उद्यापासून बंद करा

Published On: Jul 15 2018 1:28AM | Last Updated: Jul 15 2018 12:13AMनिपाणी : प्रतिनिधी

सीमाभागातून महाराष्ट्रातील विविध दूध संघांना दूध पाठविण्यात येते. सदर दूधपुरवठा 16 जुलैपासून आंदोलन यशस्वी होईपर्यंत बंद करावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिव राजेंद्र गड्ड्याण्णावर यांनी केले. येथे आयोजित स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत ते बोलत होते.

गड्ड्याण्णावर पुढे म्हणाले, दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या खात्यावर प्रतिलिटर 5 रूपये अनुदान त्वरित जमा करण्याच्या मागणीसाठी मुंबईचा दूध पुरवठा बंद करण्याचा निर्णय स्वाभिमानीने घेतला आहे. गाईच्या दुधाला थेट अनुदान मिळावे. दूध पावडरची निर्यात करण्याची मागणी असताना महाराष्ट्र शासन दूध पावडरला अनुदान देण्याच्या तयारीत आहे. याचा फायदा थेट दूध उत्पादकांना होणार नाही. खासगी दूध पावडर तयार करणार्‍या कारखान्यांना  त्याचा लाभ होणार आहे.

सदर कारखाने 15 ते 17 रूपये दराने दूध खरेदी करून बाजारभावाप्रमाणे विकतात. सीमाभागातील 45 हजार टन तर महाराष्ट्रातील अडिच ते तीन लाख टन दूध पावडर सध्या पडून आहे. केंद्राने निर्यात बंदी उठविली पाहिजे. दूध पावडरचा शालेय पोषण आहारात समावेश केला पाहिजे. अविकसित देशांना करन्सी स्वरूपातील मदत देण्यापेक्षा वस्तू रूपात साखर, दुग्धजन्य पदार्थांची निर्यात केल्यास देशांतर्गत भाव स्थिर होण्यास मदत होणार आहे.

शेतकरी हाच शेतमजूर म्हणून काम करत आहे. त्याला त्याच्या घामाचा दाम मिळाला पाहिजे. आज गाईच्या दुधाचे भाव कमी झाले असून खाद्यपदार्थांचे दर मात्र वाढले आहेत. दुधाला अपेक्षित भाव मिळत नाही. त्यासाठी मुळावर घाव घालण्यासाठी दूध बंद आंदोलन हाती घेतले आहे. 

खा. राजू शेट्टी यांनी दूध उत्पादकांना 5 रूपये थेट अनुदानाची मागणी केली आहे. या आंदोलनात सीमाभागातील दूध उत्पादक शेतकर्‍यांनी सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहनही गड्ड्याण्णावर यांनी केले. यावेळी रमेश खोत, दत्तात्रय खोत, महेश कंगळे, संदीप पोवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. प्रा. एन. आय खोत यांनी आभार मानले.