Mon, Jan 21, 2019 09:20होमपेज › Belgaon › तुरमुरी कचराडेपो विस्तारण्याचा प्रयत्न

तुरमुरी कचराडेपो विस्तारण्याचा प्रयत्न

Published On: Jan 11 2018 1:05AM | Last Updated: Jan 10 2018 11:54PM

बुकमार्क करा
उचगाव : वार्ताहर

बेळगाव शहरातील कचरा टाकण्यात येणार्‍या तुरमुरी येथील कचरा डेपोच्या बाजूला असणार्‍या खुल्या जागेत डेपोचा विस्तार करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी अधिकार्‍यांना घेराव घालून याबाबत जाब विचारला. मात्र यावेळी अधिकार्‍यांनी कोणतीही ठोस माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. यामुळे ग्रामस्थांतर्फे आज गुरुवारी सकाळी 11 वा. जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात येणार आहे.

तुरमुरी येथील टेकडीवर मागील अनेक वर्षांपासून जबरदस्तीने कचरा टाकण्यात येत आहे. याला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. परंतु या विरोधाकडे दुर्लक्ष करून हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू आहे. यामुळे या भागातील हवा प्रदूषित बनली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यातच विस्तारीकरणाचा प्रयत्न सुरू झाल्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी कचरा डेपोच्या सभोवती असणार्‍या रिकाम्या जागेवर दुरुस्तीची कामे सुरू असल्याचा प्रकार नागरिकांच्या लक्षात आला. त्यानंतर ग्रा. पं. अध्यक्ष नागनाथ जाधव, सदस्य रामू खांडेकर, लक्ष्मण जाधव, सचिव सुतार व कर्मचार्‍यांनी जागेची पाहणी केली. विस्तारीकरणाबाबत जाब विचारला. यावर उपस्थित असलेल्या अधिकार्‍यांनी थातूरमातूर उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गुरुवारी जिल्हाधिकार्‍यांना दिवेदन घेण्याचा निर्णय घेतला आहे.