Fri, Jul 19, 2019 13:40होमपेज › Belgaon › खानापुरातील ट्रक वाहतूकदार आक्रमक !

खानापुरातील ट्रक वाहतूकदार आक्रमक !

Published On: Jul 26 2018 1:31AM | Last Updated: Jul 26 2018 12:12AM खानापूर : प्रतिनिधी

डिझेल व पेट्रोल दरवाढीवरील नियंत्रण आणि वाहतूकदारांवरील टोल व अन्य जाचक कर रद्द करण्याच्या मागणीसाठी देशभर पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपात सहभागी न झालेल्या ट्रक व मालवाहू वाहनधारकांना आज खानापूर तालुका मोटार मालक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हिसका दाखविला.

सकाळपासून बेळगाव-गोवा महामार्गावर बंदच्या काळात वाहतूक सुरु ठेवणारी वाहने अडविण्यात आली. इदलहोंड क्रॉस येथे बेळगावहून येणारी वाहने अडविण्यास सुरुवात करण्यात आली. तर करंबळ क्रॉस याठिकाणी नंदगड, हल्याळ, रामनगर व गोवा या भागातून येणारी वाहने अडऊन धरण्यात आली. 

देशव्यापी संप पुकारण्यात आला असताना तो यशस्वी करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. असे असताना काही निवडक ट्रक व लॉरीमालकांकडून वाहतूक सुरुच ठेवण्यात आली आहे. परिणामी वाहतूक बंदचा सरकारवर कोणताच परिणाम जाणवत नसल्याचा आरोप करून बेमुदत संप यशस्वी करण्यासाठी विविध संघटनांनी आज रस्त्यावर उतरुन आंदोलन तीव्र केले.
केंद्र व राज्य सरकारच्या अनेक जाचक अटी आणि नियमांमुळे ट्रक व्यवसाय करणे अडचणीचे ठरले आहे. इंधन दरवाढ आणि वाढलेल्या विमा रक्कमेमुळे हा व्यवसाय नुकसानकारक ठरत आहे. त्याकरिता इंधनाचे दर समान ठेवण्याबरोबरच ट्रक व्यवसायिकांच्या अन्य मागण्यांचा सरकारने गांभिर्याने विचार करुन तोडगा काढावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे.
20 जुलैपासून ऑल इंडिया ट्रान्स्पोर्ट काँग्रेसने देशव्यापी बेमुदत वाहतूक बंदची हाक दिली. या निर्णयाला पाठिंबा देत खानापूर तालुका मोटर मालक संघटनेच्या सर्व सभासदांनी आपल्या ट्रक बंद ठेऊन संपाला जाहिर पाठींबा दिला आहे. देशभर डिजेल आणि पेट्रोलचे दर समान ठेवण्यात यावेत. रस्त्यावरील टोल वसुली बंद व्हावी. थर्ड पार्टी विमा रक्कम पुर्वीप्रमाणेच ठेवावी. त्यामध्ये प्रतिवर्षी वाढ केली जाऊ नये, या मागण्यांचा समावेश आहे.

या मागण्यांच्या पूर्ततेसाठी ट्रक व्यवसायिकांनी बेमुदत बंदची हाक दिली असताना परजिल्हा व परराज्यातील शेकडो ट्रक मालवाहतूक करत असल्याने संपाचा प्रभाव कमी होत असल्याचे आढळल्याने तालुका संघटनेने रस्त्यावर उतरून हे पाऊल उचलले. यावेळी प्रवासी व रिकाम्या वाहनांना कोणताही त्रास न देता केवळ मालवाहतूक करणार्‍या ट्रक अडविण्यात आल्या. यामुळे महामार्गावर दिवसभर वाहनांच्या रांगांचे चित्र पाहावयास मिळाले.

यावेळी राजेंद्र शिंदे, विजय साळुंखे, रामदास घाडी, मारुती गुरव, सचिन कोडोळी, निजद नेते अलिमअख्तर नाईक, रेवणसिद्धया हिरेमठ,  रेहमान मलबारी, रोशन मेस्त्री आदी उपस्थित होते.