मिरवणुकीत घुसला ट्रक; तिघेजण ठार

Last Updated: Oct 11 2019 1:09AM
Responsive image

Responsive image

कागवाड/ शिरगुप्पी : वार्ताहर 

कागवाड - गणेशवाडीदरम्यान  दुर्गामाता मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी निघालेल्या  मिरवणुकीत  सिमेंटने भरलेला ट्रक घुसल्याने दोन वर्षांच्या बालकासह तिघेजण जागीच ठार झाले. चौघे जखमी झाले आहेत. यामधील दोघांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात  बुधवारर रात्री साडेआठच्या सुमारास घडला.

सचिन कल्लाप्पा पाटील (जुगळे) (वय 38), संजय रावसाहेब पाटील (वय 40, दोघे रा. कागवाड), अभिलाष अशोक घोळप्पण्णवर (वय 2, रा. नंदीइंगळगाव, ता. अथणी) अशी मृतांची नावे आहेत. राजश्री प्रकाश पाटील (वय 40), अभिषेक शांतिनाथ मालगावे (26, दोघे रा. कागवाड) हे  गंभीर जखमी, तर इतर दोघे किरकोळ जखमी झाले असून त्यांची नावे समजू शकली नाहीत. गंभीर जखमींवर मिरज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे कागवाड परिसरावर शोककळा पसरली आहे. 

कागवाड येथून दीड किमीवर गणेशवाडी (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) मार्गावर ज्योतिर्लिंग मंदिर आहे. याठिकाणी दसरा सणानिमत्त दुर्गामातेची मूर्तीची प्रतिष्ठापना करून नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो. दहाव्या दिवशी दुर्गामातेची मिरवणूक काढण्यात येते. परंपरेप्रमाणे दहाव्या दिवशी सायंकाळी दुर्गामातेची मिरवणूक काढण्यात येत होती. रात्री साडेआठच्या सुमारास ही मिरवणूक कृष्णा नदीकडे नेण्यात येत होती. मंडपापासून शंभर दीडशे फुटावर ही विसर्जन मिरवणूक गेली असताना सिमेंटने भरलेला ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने मिरवणुकीत घुसला. यामध्ये तिघे जागीच तर चौघे जखमी झाले. सदर ट्रक कर्नाटकातून महाराष्ट्राकडे चालला होता

या अपघाताची नोेंद कागवाड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक एस. एन. शिरहट्टी करीत आहेत. गुरुवारी सकाळी शवविच्छेदनानंतर तिघांचेही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.