हुपरी : वार्ताहर
पंचतारांकित वसाहतीमधील सिल्व्हर झोनजवळ मोटारसायकल व ट्रॉली यांच्यात झालेल्या अपघातात चिकोडी तालुक्यातील मांगूर येथील अभिषेक मनोहर आडके (वय 21) हा तरुण ठार झाला. या अपघातात वैभव उत्तम नाईक (वय 25, रा. मांगूर) हा गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची नोंद गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.
येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील एका खासगी कंपनीमध्ये हे दोघे तरुण कामास होते. आज दुपारी काम संपवून दोघेजण मोटारसायकल वरून (क्र.केए 23 व्ही 8309) घरी निघाले होते. यादरम्यान एक ट्रॅक्टर (क्र.एमएच 09 सीजे 1662) सिल्व्हर झोन वसाहतीनजीकच्या एका कंपनीकडे जात होता. या ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉली (क्र.एम.एच. 09 ए.एल.4648) वर मोटरसायकल जोरदारपणे आदळली. त्यामध्ये अभिषेक आडके व वैभव नाईक रस्त्यावर जोरदार आपटल्याने गंभीर जखमी झाले. यावेळी नागरिकांनी तातडीने दोघांना उपचारासाठी कोल्हापूरला हलवले. उपचार सुरू असताना सायंकाळी अभिषेकचा मृत्यू झाला. अभिषेकचा विवाह करण्यासाठी स्थळे पाहण्याचे काम सुरू होते. लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर पडली होती. त्याच्या अपघाती मृत्यूने मांगूर गावात हळहळ व्यक्त होत होती.