होमपेज › Belgaon › बहुतेक मतदारसंघांत तिरंगी लढत

बहुतेक मतदारसंघांत तिरंगी लढत

Published On: May 09 2018 1:50AM | Last Updated: May 08 2018 8:39PMबंगळूर : प्रतिनिधी  

राज्याला पहिले मुख्यमंत्री देणार्‍या या जिल्ह्यात सहा मतदारसंघ आहेत. बहुतेक ठिकाणी काँग्रेस- निजद यांच्यात लढत आहे. एका मतदारसंघात उमेदवाराचा अर्ज अवैध ठरल्याने अपक्षाला पाठिंबा देण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे. बहुतेक ठिकाणी तिरंगी लढत होत असून काही ठिकाणी काँग्रेस-निजदमध्ये रस्सीखेच आहे.कोलार मतदारसंघात काँग्रेस आणि निजदमध्ये गटबाजी आहे. काँग्रेसने मतदारसंघाबाहेरील जमीर पाशा यांना उमेदवारी दिल्याने कार्यकर्त्यांत नाराजी आहे. माजी मंत्री श्रीनिवासगौडा यांना निदजने उमेदवारी दिली आहे. सलग दोन वेळा अपक्ष म्हणून निवडून आलेले वर्तूर प्रकाश यंदा ‘नम्म काँग्रेस पक्षा’तून रिंगणात आहेत. भाजपची मोठी चर्चा नाही. पण, कोणतेही मतभेद नसून उमेदवार ओमशक्‍ती चलपती प्रचारात आहेत.

बंगारपेठेत विद्यमान आमदार एस. एन. नारायणस्वामी, निजदचे मल्‍लेशबाबू, भाजपचे बी. पी. व्यंकट मुनियप्पा रिंगणात आहेत. येथे काँग्रेस आणि निजदमध्ये चुरस असली तरी भाजपची संघटनाही मजबूत आहे. माजी आमदार एम. नारायणस्वामी यंदा इच्छुक होते. पण उमेदवारी नाकारल्याने त्यांनी भाजपचा त्याग करून निजदमध्ये प्रवेश केला. यामुळे भाजपला काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे. एकदा संधी मिळाली की दुसर्‍यांदा संधी मिळणे कठीण, असे वैशिष्ट्य असणार्‍या श्रीनिवासपूर मतदारसंघात मंत्री रमेशकुमार काँग्रेसतर्फे, माजी आमदार जी. के. व्यंकटशिवारेड्डी निजदमधून रिंगणात आहेत. यांच्यात चुरस असून भाजपचा प्रभाव येथे नाही.

मालूरमध्ये काँग्रेस, भाजप आणि निजदमध्ये तिरंगी लढत होणार आहे. निजदचे विद्यमान आ. मंजुनाथगौडा पुन्हा निवडून येण्यासाठी कसरत करत आहेत. काँग्रेसचे के. वाय. नंजेगौडा सरकारच्या विकासकामांचा आधार घेत मतयाचना करत आहेत. भाजपतर्फे माजी मंत्री एस. एन. कृष्णय्याशेट्टी रिंगणात असून मते मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. कार्यकर्त्यांचे पक्षांतर पर्व सुरू झाले आहे. मुळबागीलुमध्ये काँग्रेसचा अधिकृत उमेदवारच नाही. मंजुनाथ यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने अपक्ष उमेदवार बेळतूर नागेश यांना पाठिंबा देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.  यामुळे भाजप उमेदवार माजी आ. अमरेश आणि निजदचे समृद्धी मंजुनाथ यांच्यात चुरस आहे. केजीएफ मतदारसंघात के. एच. मुनीयप्पा यांची मुलगी रूपा शशिधर काँग्रेसच्या उमेदवार आहेत. माजी आमदार संपंगी यांची मुलगी व विद्यमान आ. वाय. रामक्‍का यांची नात जि. पं. सदस्या अश्‍विनी रिंगणात आहेत. या दोन्ही उमेदवारांच्या विजयाची जबाबदारी त्यांच्या पालकांनी पेलली आहे. निजद उमेदवार भक्‍तवत्सल त्यांच्यावर मात करण्यासाठी कसरत करत आहेत.