Mon, Mar 25, 2019 09:39होमपेज › Belgaon › झाडे लावली, पण जगवायची कोणी ?

झाडे लावली, पण जगवायची कोणी ?

Published On: Jul 31 2018 1:29AM | Last Updated: Jul 30 2018 8:53PMबेळगाव : प्रतिनिधी

पर्यावरणाचा र्‍हास आणि वाढते तापमान याचा जगभर उहापोह झाल्यानंतर सर्वच पातळीवर वृक्षलागवडीची चर्चा सुरू झाली. आणि सर्वत्र वृक्षलागवड मोहीम गतिमान करण्यात आली. विविध ठिकाणी शासनाकडून झाडे लावण्यात आली. मात्र, ती झाडे जगवायची कोणी? हा प्रश्‍न मात्र अनुत्तरितच राहत आहे. 

राज्याच्या एकूण जंगलक्षेत्रात वाढ करण्यासाठी दरवर्षी लाखो वृक्ष लावण्यात येत आहेत. मात्र, या झाडांच्या संगोपनाकडे फारसे लक्ष दिले जात नाही. वनखात्याने बेळगाव तालक्यातील ग्रामीण भागात प्रमुख मार्गावर दुतर्फा आंबा, फणस, चिंच यासह अन्य पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. महिनाभरापूर्वी तालुक्यात हजारो झाडे लावण्यात आली आहेत. मात्र या झाड्यांच्या देखरेखीकडे दुर्लक्ष होत आहेत. मोकाट जनावरांकडून रस्त्याकडेला लावण्यात आलेल्या झाडांचे नुकसान करण्यात येत आहे. लावण्यात आलेल्या झाडांचे संरक्षण करण्याचा वनखात्याला विसर पडला आहे. 

वनखात्यातर्फे लाखो रुपयांचा निधी खचर्र् करून जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करून झाडे लावण्यात आली आहेत. मात्र, यापैकी काही झाडे गायब होत आहेत. तर काही झाडे जनावरांकडून फस्त होत आहेत. झाडांच्या संरक्षणासाठी धडक मोहीम राबविणे गरजेचे आहे. 

बेळगाव शहरासह उपनगरात हेस्कॉमकडून काही जुन्या झाडांची छाटणी सुरू आहे. काही ठिकाणी केवळ फांद्या तोडणे गरजेचे असताना अवास्तव फांद्या तोडण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांतून करण्यात येत आहे.  दोन दिवसापूर्वी काँग्रेस रोड येथील एका जुन्या झाडाची हेस्कॉमने अवास्तव कत्तल केली आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. असाच प्रकार आरटीओसर्कल येथील पोलिस निवास्थानाशेजारी व सदाशिवनगर तिसरा क्रॉस येथेही घडला आहे.