बेळगाव ः प्रतिनिधी
‘केएसआरटीसी’च्या बसमधून यापुढे पाळीव प्राणी व पक्ष्यांना घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. परिवहन महामंडळाने ‘प्राणी हे मित्र’ ही संकल्पना अमलात आणली असून यापुढे प्रवाशांना त्यांच्या पाळीव आणि नोंदणीकृत कुत्रा व मांजर यांना आपल्यासोबत घेऊन जाता येणार आहे.
पाळीव प्राण्यांना बसमधून घेऊन प्रवास करण्यासाठी 20 किलोमागे दहा रुपये आणि त्यानंतर अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे. प्राणी आणि पक्षी यांची जबाबदारी प्रवासी किंवा त्या मालकावर राहणार आहे. बसमधून प्रवास करत असताना याबाबत आगाऊ सूचना देण्याबरोबरच त्यासाठी नोंदणी करणे किंवा सदर शुल्क भरणे अनिवार्य आहे.
बर्याचशा प्रवाशांना पाळीव कुत्र्याला घेऊन जाण्याबाबत मनाई करण्यात येत असल्याने परिवहन मंडळाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी येत होत्या. बंगळूरपासून अन्य विविध मार्गांवर परिवहन महामंडळाच्या 8 हजारांहून अधिक बस गाड्या राज्यासह शेजारील राज्यांमध्येही धावतात. या बसगाड्यांमधून कुत्रा तसेच पाळीव प्राण्यांना घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात याला होता. प्रवास करत असताना लहान बालक व इतरांना त्यांनी चावा घेऊ नये व रॅबिज होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता 30 किलोंपर्यंत वजनाच्या प्राणी आणि पक्ष्यांना घेऊन जाता येणार असल्याचे कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एस. आर. उमाशंकर यांनी सांगितले.
कुत्रा हा पाळीव प्राणी आहे. तो मालकाशी प्रामाणिक असतो. त्याच्याशी कसे वागावे आणि कसे वागू नये हे प्रत्येकाने ठरवावे लागते. यापुढे कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांमधून पाळण्यात आलेल्या कुत्र्यांना घेऊन जाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे आता परिवहन मडामंडळाच्या बस गाड्यामध्ये कुत्रा दिसला तर आश्चर्य मानावे लागणार नाही.