Thu, May 23, 2019 21:06
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › कोणी भंगार घेता का भंगार?

कोणी भंगार घेता का भंगार?

Published On: Jul 11 2018 1:35AM | Last Updated: Jul 10 2018 8:48PMबेळगाव : सतीश जाधव 

ऑटोनगर येथील वायव्य परिवहन महामंडळाच्या विभागीय तांत्रिक टाकाऊ साहित्याच्या आगारात भंगारात काढलेल्या बस, टायर, ट्यूब, पाटे व इतर साहित्य वर्षभरापासून पडून आहे. बंगळूर येथून निविदा काढूनही त्याला कोणी खरेदीदार मिळत नसल्याने वायव्य परिवहन महामंडळाची डोकेदुखी वाढली आहे. यामुळे ‘कोणी भंगार घेता का भंगार’ असे म्हणण्याची वेळ महामंडळावर आली आहे. 

अपघात, दुरुस्ती खर्च अधिक, अनेक वर्षापासून सेवेत असलेल्या बस व आरटीओने बाद ठरविलेल्या बस भंगारात काढल्या जातात. यासाठी बंगळूर  येथून राज्य परिवहन महामंडळ निविदा काढते. गतवर्षी निविदा काढण्यात आली होती. मात्र, खरेदीदार कोणीही नसल्याने आगारात बस पडूनच आहेत. यासाठी पुन्हा निविदा काढण्याची प्रक्रिया राज्य परिवहन महामंडळाने सुरु ठेवली आहे. 

खरेदीदार मिळाल्यानंतर बस क्रेनच्या साहाय्याने हुबळीला पाठवून दिल्या जातात. तेथे खरेदी प्रक्रिया पार पडते. प्रतिवर्षी बसची पासिंग प्रक्रिया पार पडते. यावेळी आरटीओ ज्या बस नाकारते त्या भंगारात काढल्या जातात. खरेदीदार आले नाहीत तर ऑटोनगर येथून क्रेनच्या सहाय्याने हुबळीला बस पाठवून दिल्या जातात.   चिकोडी, धारवाड, बेळगाव, हुबळी, बागलकोट असे एकूण 8 विभाग आहेत. प्रत्येक विभागात एक दुरुस्ती व भंगार आगार आहे. यापूर्वी परराज्यातून खरेदीदार आले होते. विशेषत: तमिळनाडूतील खरेदीदार असतात. वर्षभरापूर्वी 80 बस विकल्या गेल्या होत्या. भंगारात विकल्या गेलेल्या बस किलोवर घेतल्या जातात. या आगारात परिवहन बसचे गिअर बॉक्स, इंजीन काम, काचा बसवून दिल्या जातात.

महामंडळ ऑनलाईन निविदा मागविते. राज्यातील आगारात भंगारात असलेल्या बससाठी दरवर्षी ही प्रक्रिया पार पडते. खरेदीदार मिळाला नाही तर पुन्हा निविदा काढली जाते. बेळगाव विभागात एकूण 7 डेपो आहेत. सीबीटी, सीबीएस, ऑटोनगर,  आरटीओ सर्कल, खानापूर, बैलहोंगल आणि रामदुर्ग हे डेपो प्रवाशांच्या सेवेसाठी आहेत. या डेपोतून रोज 762 बस धावतात. यामधून दरवर्षी खराब झालेल्या बस भंगारात काढल्या जातात.