Thu, Jul 18, 2019 10:10होमपेज › Belgaon › तृतीयपंथीयांची नोंद महिला किंवा पुरुष!

तृतीयपंथीयांची नोंद महिला किंवा पुरुष!

Published On: Mar 07 2018 12:16AM | Last Updated: Mar 07 2018 12:06AMबेळगाव : प्रतिनिधी 

तृतीयपंथीयांच्या ओळख-पत्रांमध्ये त्यांची नोंद पुरुष अथवा महिला म्हणून करण्यात आली आहे. हा अजब कारभार आज स्वीप समितीच्या बैठकीत उघडकीस आला. त्यांनंतर तातडीने दुरुस्ती करण्याची ग्वाही जि. पं. सीईओ आर. रामचंद्रन यांनी दिली आहे.

जिल्हाधिकार्‍यांच्या सभागृहामध्ये झालेल्या तृतीयपंंथी संघटनांच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीत ते बोलत होते. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला मतदानाचा हक्क देण्यात आला आहे. तृतीय पंथीयांनीसुद्धा मतदान करुन आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन रामचंद्रन यांनी केले.

जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात असलेल्या तृतीय पंथीयांची नोंद घेवून त्यांना मतदान ओळखपत्र देण्याचा निर्णय जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांनी घेतला आहे. तृतीयपंथी संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्यासाठी आपल्या संघटनेतील तृतीयपंथी कार्यकर्त्यांची यादी दिल्यास त्यांना तत्काळ मतदान ओळखपत्र देण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे रामचंद्रन यांनी यावेळी सांगितले. 

प्रकाश मराठे आणि तानाजी सावंत यांनी जिल्ह्यातील तृतीयपंथीयांची माहिती दिली. जिल्ह्यामध्ये 1050 तृतीयपंथी आहेत. पैकी अनेक जणांची मतदार यादीमध्ये नावे असून त्यांना मतदान ओळखपत्रही देण्यात आले आहे. मात्र, त्यात लिंगाचा झालेला घोळ सांगितला. तसेच यामुळे तृतीयपंथीयांचे अस्तित्व दिसून येत नाही, असे स्पष्ट केले. आर. रामचंद्रन यांनी तक्रार निवारण करण्याचे आश्‍वासन दिले. वितरीत करण्यात आलेल्या मतदार ओळखपत्रामध्ये नमूद करण्यात आलेल्या स्त्री अथवा पुरुष या ऐवजी तृतीयलिंग असे म्हणून दुरुस्ती करुन देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. या संदर्भात अधिकार्‍यांनाही दुरुस्ती करण्याची सूचना केली. तसेच तृतीयपंथी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी या संदर्भातील माहिती लवकरच देण्यात येईल, असे सांगितले. 
निवडणूक आयोगाने प्रत्येकाला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.  त्यामुळे संबंधितांचे नाव मतदारयादीत नोंद करुन घेण्यासाठी विविध उपक्रम आयोजित केले आहेत.

यासाठीत तृतीयपंथीयांनीही मतदार यादीमध्ये आपली नावे नोंदवून घेवून मतदानाचा हक्क बजावावा. फॉर्म नं. 8 घेवून दुरुस्ती करुन घेण्यात यावी. यानंतर फार्म नं. 6 भरून दिल्यास जिल्हा प्रशासनाकडून मतदान ओळखपत्र देण्यात येईल, असे स्पिक अध्यक्ष आर. रामचंद्रन यांनी सांगितले.
यावेळी महिला आणि बाल कल्याण खात्याचे अधिकारी मुनिराज आदी उपस्थित होते.