Fri, May 24, 2019 21:21होमपेज › Belgaon › कैद्यांना मडके बनविण्याचे प्रशिक्षण

कैद्यांना मडके बनविण्याचे प्रशिक्षण

Published On: Feb 15 2018 1:55AM | Last Updated: Feb 14 2018 9:37PMबेळगाव : प्रतिनिधी

विविध गुन्ह्यांमध्ये सजा भोगणार्‍या कैद्यांना सन्मार्गी आणण्याबरोबरच जेलमधून बाहेर पडल्यानंतर त्यांना स्वावलंबी जीवन जगण्यास मदत व्हावी, या उद्देशाने हिंडलगा कारागृहामधील कैद्यांना मडके बनविण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. कारागृहाचे अधीक्षक टी. पी. शेषा यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. 

शेषा यांनी खानापूर येथील मडके प्रशिक्षण केंद्राला भेट दिली होती. येथील चित्ताकर्षक विविध आकाराची, उपयोगाची मडकी पाहिली. या केंद्रातील प्रशिक्षितांशी संवाद साधला. यावेळीच त्यांना कारागृहातील कैद्यानांही असे प्रशिक्षण दिल्यास भविष्यात त्यांना फायदा होईल, असा विचार केला होता. याने प्रेरित झालेल्या शेषा यांनी कैद्याना प्रशिक्षण देण्याची तयारी सुरू केली. कारागृहात यापूर्वी अशा प्रकारचे प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती मिळाली. त्यांनी खानापूर येथील मडके प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य एस. एस. तंबे यांची भेट घेऊन हा विचार सांगितला..

प्र्रशिक्षण केंद्राच्या मदतीने शेषा यांनी हिंडलगा कारागृहात मडके प्रशिक्षणाला सुरुवात केली. ऑक्टोबर 2017 मध्ये प्रारंभ करण्यात आला. मडकी तयार करण्यासाठी दोन विद्युत यंत्रांची सोय करण्यात आली. 

देशातील सर्वात मोठ्या कारागृहांमधध्ये हिंडलग्याचा तिसरा क्रमांक लागतो. या कारागृहात 900 पेक्षा अधिक कैदी आहेत. यामधील काही जणांची सुटका होणार आहे. तर काहींच्या वर्तनात सुधारणा झाल्याने सुटका होणार आहे. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर स्वावलंबी जीवन जगण्यास मदत व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला. हा उद्योग करु इच्छिणार्‍या 30 पेक्षा अधिक कैद्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. भविष्यात स्वयंरोजगार करण्यास मदत होईल, हा यामागचा उद्देश असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. 

प्रशिक्षण देण्यासाठी खानापूर येथील केंद्रातील कर्मचारी दररोज कारागृहात येऊन मडके बनविण्याचे प्रशिक्षण देत आहेत.