होमपेज › Belgaon › दूधसागरवरील पर्यटन बंदी यावर्षीही कायम 

दूधसागरवरील पर्यटन बंदी यावर्षीही कायम 

Published On: Jun 21 2018 1:26AM | Last Updated: Jun 20 2018 10:29PMखानापूर : प्रतिनिधी

पावसाळा सुरु होताच पर्यटकांची पावले दूधसागर धबधब्याचे विहंगम दृश्य नजरेत साठविण्यासाठी कॅसलरॉकच्या दिशेने वळू लागतात. मात्र निष्काळजीपणामुळे अनेक पर्यटकांचा दरीत पडून मृत्यू होण्याच्या घटनांत वाढ झाल्याने गेल्या तीन वर्षापासून दूधसागर धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. यावर्षीही ही बंदी कायम ठेवण्यात आली असल्याने दूधसागरच्या दर्शनापासून यंदाही वर्षाप्रेमींना मुकावे लागणार आहे. 

अनेक हिंदी व दाक्षिणात्याचित्रपटांच्या चित्रीकरणामुळे दूधसागर धबधब्याचा देशात सर्वदूर लौकिक पोहोचला आहे. बेळगाव, हुबळी, बंगळूर, म्हैसूर, गोवा, कोल्हापूर, पुणे यासह विविध शहरातून पर्यटक पावसाळ्यात वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी दूधसागर धबधब्याला भेट देणे पसंद करतात.

रेल्वेलाईनवरील खंदक आणि ट्रॅकवर फेसाळत कोसळणारे लहान-मोठ्या धबधब्यांचे प्रवाह आणि आजूबाजूचा हिरवागार निसर्ग यामुळे पावसाळ्यातील परफेक्ट डेस्टिनेशन म्हणून दूधसागरला सर्वाधिक पसंती देण्यात येते. याठिकाणी जाण्यासाठी केवळ रेल्वे प्रवास हा एकच पर्याय असल्याने दूधसागरला जाणार्‍या व येणार्‍या रेल्वेगाड्यांमध्ये अनेकदा चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या आहेत.

अतिहुल्लड पर्यटकांच्या निष्काळजीपणामुळे दरीत कोसळून जीव जाण्याच्या वर्षाकाठी चार ते पाच घटना घडल्या आहेत. या सर्व दुर्घटनांच्या पार्श्‍वभूमीवर रेल्वे आणि केंद्रीय वनविभागाने धोकादायक ठिकाणांची पाहणी केली. दूधसागरवर हे ठिकाण पर्यटनासाठी सुरक्षित नसल्याचे आढळून आल्यानंतर याठिकाणी पर्यटनासह मानवी प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे.

बंदीच्या या निर्णयामुळे निसर्गप्रेमींमध्ये नाराजी पसरली होती. त्यामुळे पर्यटन विभाग व निसर्गप्रेमींतून सदर धबधबा पर्यटनासाठी खुला करण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र रेल्वेने येथील पर्यटनावरील बंदी कायम ठेवत कॅसलरॉक ते दूधसागर या मार्गावरील रेल्वेट्रॅक पोलिसांचा बंदोबस्त कायम ठेवला आहे. परिणामी वर्षापर्यटकांचा यावर्षीही हिरमोड झाला आहे.

दूधसागर परिसरात अद्यापही पावसाने जोर धारण केला नसल्याने धबधब्याचे पूर्ण सौंदर्य खुललेले नाही. त्यातच बंदीमुळे पर्यटकांना जाता-जाता रेल्वेतूनच धबधब्याचे दर्शन घेऊन समाधान मानावे लागत आहे.

2015 पर्यंत दूधसागर धबधब्याच्या ठिकाणी विनंतीवरून प्रवासी रेल्वे थांबत होत्या. मात्र काही अतिउत्साही पर्यटक मालवाहू रेल्वेमध्ये चढण्याचा प्रयत्न करत. 2015 साली काही पर्यटकांनी मालवाहू रेल्वे थांबली नसल्याने दगडफेक केली. त्यामुळे या ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे.