Wed, Aug 21, 2019 20:05होमपेज › Belgaon › मनपरिवर्तनासाठी आज शेवटची संधी

मनपरिवर्तनासाठी आज शेवटची संधी

Published On: Aug 23 2018 1:26AM | Last Updated: Aug 23 2018 12:37AMनिपाणी : प्रतिनिधी

येत्या 31 रोजी होणार्‍या निपाणी नगरपालिका निवडणुकीसाठी अनेकांनी अर्ज दाखल केले  असून चांगलीच मोर्चेबांधणी सुरु आहे. आपापल्या वॉर्डातील उमेदवारी दाखल केलेल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांबरोबर मनधरणी करण्याचा  प्रयत्न सुरु आहे.

दि. 23 हा अर्ज माघारीची शेवटचा दिवस असल्याने मनधरणी, विनवणी आणि मनपरिवर्तनाचा आज शेवट दिवस आहे. उद्यापासून एकमेकांविरोधात शड्डू ठोकून प्रचारात उतरावे लागणार असून काँग्रेसप्रणित गट आणि भाजपमध्ये अस्तित्त्व सिध्द करणारी निवडणूक ठरणार आहे.

माजी आ. काकासाहेब पाटील, प्रा. सुभाष जोशी, नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी काँग्रेसप्रणित गटाकडून अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. दुसरीकडे भाजप पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचे ठरवून आखाड्यात उतरला आहे. यंदा वॉर्ड पुनर्रचनेनंतर अनेक इच्छुकांची निराशा झाली असली तरी पर्याय उपलब्ध करुन नातेवाईकांची उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्या वाढल्याने साहजिकच मनधरणी आणि मनपरिवर्तन करताना अनेक क्‍लृप्त्या लढवाव्या लागत आहेत.

24 ऑगस्टपासून प्रचाराला खरा रंग चढणार असला तरी अनेकांनी उमेदवारी दाखल केल्यापासून गाठीभेटी, बैठका, अंतर्गत प्रचारासह जेवणावळींवर भर देऊन प्रचारात आघाडी घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. वॉर्ड पुनर्रचनेमुळे कोणालाही इतका सहजासहजी विजय शक्य न राहिल्याने निवडणूक रंगतदार होणार आहे.

निवडणुकीत महिलांना 50 टक्के आरक्षण मिळाल्याने 31 पैकी 15 जागांवर महिला लढत आहेत. शिवाय उर्वरित वॉर्डातून एक-दोन जरी महिला उमेदवार विजयी झाल्या तरी पालिकेवर महिलाराज येणार आहे. काही माजी नगरसेवकांना  आरक्षणामुळे उमेदवारी मिळाली नसली तरी नातेवाईकांची उमेदवारी दाखल केल्याने निवडणूक इर्ष्येची होणार आहे.

उमेदवारी भरल्यापासून अनेक इच्छुकांनी उमेदवाराच्या माघारीसाठी कंबर कसली आहे. अनेक ठिकाणी माघारीसाठी होणार्‍या प्रयत्नांना आज पूर्णविराम मिळणार आहे. त्यामुळे आता मनधरणी, विनवणी आणि मनपरिवर्तनातून बाहेर पडून निवडून येण्यासाठी जोमाने रिंगणात उतरावे लागणार आहे. काही वॉर्डांमध्ये उमेदवारांची संख्या वाढल्याने मतदारांनाही कोणाच्या मागून फिरायचे, हा प्रश्‍न पडला आहे. 

माघारीकडे शहरवासियांचे लक्ष

भाजप आणि काँग्रेसप्रणित गटासाठी यंदाची निवडणूक अस्तित्त्वाची लढत असल्याने दोन्ही पक्षांना पालिकेवर आपलीच सत्ता येणार, असा मोठा विश्‍वास आहे. आता अर्ज माघारीनंतर निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या ठरणार असून खर्‍याअर्थाने निवडणुकीला रंग चढणार आहे. अर्ज माघारीकडे संपूर्ण शहरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.