Wed, Jul 17, 2019 00:38होमपेज › Belgaon › आज कर्नाटक बंदची हाक

आज कर्नाटक बंदची हाक

Published On: Jan 25 2018 1:02AM | Last Updated: Jan 24 2018 11:46PMबेळगाव-जांबोटी : प्रतिनिधी

म्हादईचे पाणी तातडीने कर्नाटकाला मिळावे आणि कळसा-भांडुरा नालाजोड प्रकल्प पूर्ण व्हावा, या मागणीसाठी कन्‍नड संघटनांनी गुरुवारी कर्नाटक बंदची हाक दिली आहे. बंदला बेळगाव-खानापुरात प्रतिसाद अपेक्षित नाही. मात्र, प्रशासनाने खानापूरसह कित्तूर, बैलहोंगल, सौंदत्ती, रामदुर्ग या तालुक्यातील शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर बससेवेचा निर्णय उद्या स्थिती पाहून घेतला जाणार आहे.

गोवा आणि कर्नाटक राज्यांच्या जलसंपदा मंत्र्यांनी गेल्या 15 दिवसांत कळसा प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर दोन्ही राज्यांदरम्यान  तणाव आहे. उद्याच्या बंदच्या हाकेमुळे खानापूरसह मलप्रभा खोर्‍यातील तालुक्यांतील शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला यांनी बजावला आहे. 

बससेवा परिस्थितीवर अवलंबून 

बंदमुळे बससेवा बंद ठेवणार का, असे परिवहन महामंडळाचे बेळगाव विभाग नियंत्रणाधिकारी गणेश ठोड यांना विचारले असता, उद्या  परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. 

म्हादई रक्षायात्रेला सुरलहून प्रारंभ

गोव्याच्या अस्तित्वाला बाधक ठरणार्‍या म्हादई प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी तसेच गोव्यातील जनतेत म्हादई बचावासाठी जागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘म्हादई संपदा रक्षायात्रे’ला आज सकाळी कणकुंबीजवळील गोव्याच्या हद्दीतील सुरल गावातून प्रारंभ झाला.

सुरल गाव गोव्यात असले तरी तेथे जाण्यासाठी कर्नाटकाच्या हद्दीतून जावे लागते. त्यामुळे रक्षायात्रेला जाणार्‍या कार्यकर्त्यांना अडविण्यासाठी कर्नाटकी पोलिसांनी चोर्लाजवळ कडक पहारा ठेवला होता. मात्र गनिमी काव्याने पोलिसांना चकवा देत गटागटाने कार्यकर्ते सुरलमध्ये दाखल झाले. ठरल्याप्रमाणे गावातील सातेरी केळबाय मंदिरात दहा नद्यांच्या पाण्यांचा समावेश असलेल्या कलशाची पूजा करुन रक्षायात्रेला सुरवात झाली. ही यात्रा 30 जानेवारीपर्यंत चालणार असून, गोव्यात जागृतीसाठी हा उपक्रम राबवला जात आहे.

म्हादई पाण्यासाठी गुरुवारी कर्नाटक बंदची हाक दिलेली असताना तिकडे गोमंतकियांनीही म्हादईचे अस्तित्व टिकविण्यासाठी म्हादई बचाव आंदोलनाला लोकलढ्याचे स्वरुप देण्याचा प्रयत्न चालविला आहे. गोवा सुरक्षा मंचचे प्रमुख आनंद शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली सात दिवसाच्या यात्रेला सुरलमधून सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी कळसा-भांडुरा नाल्यासह म्हादईच्या 10 उपनद्यांचे पाणी असलेल्या कलशाचे पूजन करण्यात आले. प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सुरल, केरी, साखळी, वाळपई, धावे, गांजे, जुने गोवा यामार्गे ही यात्रा 30 रोजी पणजीत दाखल होणार आहे.

म्हादईला उत्तर गोव्याची जीवनदायिनी संबोधले जाते. गोव्याच्या मानवी तसेच वनसंपदेचे जतन करणे हे गोवा सरकारबरोबरच जनतेचेही आद्य कर्तव्य आहे. म्हादई रक्षणाबाबत जागृती निर्माण करुन लोकमत तयार करण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.