Wed, Jul 24, 2019 08:12होमपेज › Belgaon › सीमाभागातील संमेलनांना बळ देणार

सीमाभागातील संमेलनांना बळ देणार

Published On: Jan 10 2018 1:56AM | Last Updated: Jan 09 2018 9:33PM

बुकमार्क करा
 

बेळगाव : प्रतिनिधी

सीमाभागात होणार्‍या साहित्य संमेलनातून मराठीचा जागर केला जातो. ही संमेलने मराठी भाषिकांची भावनिक गरज आहे.  त्यांना बळ देण्याचे काम मसापतर्फे आम्ही निश्‍चित करू, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी (पुणे) यांनी केले. कुद्रेमानी येथे रविवार दि. 7 रोजी झालेल्या एकदिवसीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्रा. मिलिंद जोशी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी उपरोक्त माहिती दिली.
जोशी म्हणाले, कोणत्याही शासकीय मदतीविना लोकवर्गणीतून बेळगाव परिसरात सुमारे अकरा साहित्य संमेलने भरविण्यात येतात. यापैकी काही संमेलनांना आपण निमंत्रित वक्ते म्हणून हजेरी लावली आहे. संमेलनाच्या आयोजकांची प्रत्यक्ष धडपड पाहिली आहे. 

सीमाभागातील मराठी बांधव अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ज्ञानोबा, तुकोबाचा गजर करत मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा झेंडा दिमाखात फडकवत आहेत. हे खर्‍या अर्थाने मराठी भाषेचे सीमेवरचे सैनिक आहेत. साहित्य संमेलने हा मराठी समाजाचा वाड़मयीन  उत्सव आहे. यातून समाजाला नैतिक बळ मिळते. म्हणून अशी संमेलने ही लोकांची भावनिक आणि वैचारिक गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सीमाभागात होणारी संमेलने मराठी साहित्य आणि सांस्कृतिक मंडळांनी पाहण्याची आवश्यकता आहे. यातून त्यांना अशा छोट्या, छोट्या संमेलनांची उपयुक्तता लक्षात येईल. छोटी संमेलने खर्‍या अर्थाने वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्यात मोलाची भूमिका बजावतात.

सीमाभागातील ग्रामीण भागात मसापची शाखा सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. सीमाभागातील मराठी बांधवांसाठी मसापचे काही नियम शिथिल करण्यात आले व त्यातून मंजुरी देण्यात आल्याचे सांगितले. मसापचा कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत असल्यामुळे येथील संमेलने, वाचनालये यांना कोणत्याप्रकारे मदत करता येईल, याबाबत विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. संमेलने, वाचनालये संवर्धनासाठी शक्य तितके प्रयत्न करत असून सीमाभागातील साहित्यिक घडामोडीना बळ देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.