Wed, Jul 17, 2019 10:22होमपेज › Belgaon › बेकिनकेरे-होसूर मार्गावर वाघाची अफवाच

बेकिनकेरे-होसूर मार्गावर वाघाची अफवाच

Published On: Sep 01 2018 1:45AM | Last Updated: Aug 31 2018 11:18PMबेळगाव : प्रतिनिधी

होसूर-बेकिनकेरे मार्गावर वाघाचे दर्शन झाल्याचे वृत्त शुक्रवार दि. 31 रोजी काही वृत्तपत्रांत प्रसिद्ध करण्यात आले. मात्र सदर वाघाचे छायाचित्र या मार्गावरील नसल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. चंदगड वन खात्यातर्फे शुक्रवारी होसूर घाट परिसराला भेट देऊन पाहणी करण्यात आली. 

पंधरवड्यापूर्वी बेकिनकेरेजवळ कोवाड येथील प्रा. एस. टी. कदम यांना वाघाचे दर्शन झाले. मात्र वाघाची चित्र अन्य ठिकाणचे असल्याचे संदेश शुक्रवारी सोशल मीडियावर फिरत होते.  पाटणे येथील वनक्षेत्रपाल एम. एन. परब, वनपाल अमोल शिंदे, वनरक्षक आर. आर. नाईक, संग्राम जितकर, विश्‍वनाथ नार्वेकर, एम. एच. निर्मळकर, अमगोंडा बिरादार यांच्यासह होसूरचे माजी सरपंच सट्टॅप्पा पाटील, विजय पाटील यांनी होसूर-बेकिनकेरे  सीमेवरील जंगलात वाघाच्या संचाराबाबत खातरजमा करुन घेतली. 

रविवार दि 19 रोजी रात्री 8 वा. बेळगावहून कोवाडला कारमधून जात असताना बेकिनकेरे बसथांब्याच्या अलिकडे उताराला रस्त्यावरून वाघाने उडी मारल्याचे प्रा. एस. टी. कदम यांच्यासह त्यांच्या पत्नी व मुलीनेही पाहिले आहे. या पार्श्‍वभूमीवर वनखात्याने शुक्रवारी या परिसराला भेट दिली. 

हत्तींना आवरा रे!

खानापूर : प्रतिनिधी

गेल्या महिनाभरापासून नागरगाळी, हलगा, करजगी परिसरात हत्तीच्या कळपाने धुमाकूळ घातला असून दोन दिवसापूर्वी तर सदर हत्ती नागरगाळी गावच्या वेशीत पोहचल्याने शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तीन ठिकाणी हत्तींच्या वेगवेगळ्या कळपांनी ठाण मांडल्याने बळीराजावर यावर्षीही पिकांवर पाणी सोडण्याची वेळ आली आहे.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात हत्तींच्या कळपाचे दांडेली जंगलातून खानापूर तालुक्यात आगमन झाले आहे. दरवर्षीची समस्या असतानाही दांडेली अभयारण्यातून हत्तींचा खानापूर तालुक्यात प्रवेश होऊ नये. यासाठी वनखात्याकडून काहीच उपाययोजना केल्या जात नाहीत.

गेल्या महिनाभरापासून या कळपाने नागरगाळी परिसरात ठाण मांडले असून पिकांचे नुकसान चालविले आहे. मंगळवारी सकाळी तरी चक्क नागरगाळी ग्रा. प. कार्यालयापर्यंत हत्तींनी आपला मोर्चा नेला होता. या हत्तीने मुरारी गुळेकर, नारायण चौधरी, नारायण कवळेकर आदींच्या शेतातील भातपिकांचे नुकसान केले आहे.  हलगा येथील रणजित पाटील व अन्य शेतकर्‍यांच्या ऊस व भातपिकाचाही फडशा पाडला आहे. पोसवणीला आलेल्या भातपिकाची नासधूस झाल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.