होमपेज › Belgaon › भूतरामहट्टीत साकारणार ‘व्याघ्र प्रकल्प’!

भूतरामहट्टीत साकारणार ‘व्याघ्र प्रकल्प’!

Published On: Aug 14 2018 1:08AM | Last Updated: Aug 13 2018 11:33PMबेळगाव : प्रतिनिधी

पुणे-बंगळूर महामार्गावरील भूतरामहट्टी पार्कची सुधारणा मनपाकडून करण्यात येणार आहे. या ठिकाणी व्याघ्र प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी दोन कोटी रु. निधीची तरतूद केली आहे.

आ. सतीश जारकीहोळी यांच्या सूचनेनुसार मनपा आयुक्‍त शशिधर कुरेर व वन खात्याच्या अधिकार्‍यांनी सोमवारी पार्कची पाहणी केली. यावेळी आ. जारकीहोळी यांनी अधिकार्‍यांना सूचना केल्या. 

भूतरामहट्टी येथे सुमारे पाच हजार एकर क्षेत्रात प्राणी संग्रहालय आहे. याचा विकास करण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेतील तिसर्‍या टप्प्यातील 100 कोटींचा निधी वापरण्यात येणार आहे. यातील दोन कोटी निधी व्याघ्र प्रकल्पासाठी खर्चण्यात येणार आहे. त्यानुसार या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प राबविण्यात येणार आहे. आ. सतीश जारकीहोळी यांच्या सूचनेनुसार मनपा अधिकार्‍यांनी पाहणी केली. मनपातर्फे हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. 

प्राणी संग्रहालय 5 हजार एकर क्षेत्रात आहे. या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प सुरू करण्यासाठी 1.8 कि. मी. संरक्षक भिंत उभारण्यात येईल. भिंतीची उंची 8 फूट आवश्यक असल्याची माहिती वन खात्याच्या अधिकार्‍यांनी मनपा आयुक्‍तांना दिली.

मनपा आयुक्‍त कुरेर म्हणाले, दोन कोटींच्या निधीतून व्याघ्र प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात संरक्षण भिंत उभारणीचे काम हाती घेण्यात येईल. त्यानंतर या ठिकाणी असणार्‍या तलावांची सुधारणा करण्यात येईल. या ठिकाणी असणार्‍या प्राणी-पक्ष्यांना या माध्यमातून पाण्याची सोय करून देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती दिली. व्याघ्र सफारी सुरू करण्याबाबतची माहिती वन खात्याने त्वरित राष्ट्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकारणाला कळवावी, असे आदेश आयुक्तांनी वनखात्याच्या अधिकार्‍यांना दिले. 

बेळगाव शहराकडे देशभरातील पर्यटक खेचून आणण्यासाठी व्याघ्र सफारी प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे प्राणी संग्रहालयाच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येईल. यामाध्यमातून शहराचा विकास होणार आहे. यासाठी आवश्यक सहकार्य देण्याची ग्वाही आयुक्त कुरेर यांनी दिली. मनपा मुख्य अभियंता आर. एस. नायक आदीसह वनखात्याचे अधिकारी उपस्थित होते.