होमपेज › Belgaon › जवानांच्या कवायतींचा थरार

जवानांच्या कवायतींचा थरार

Published On: Dec 16 2017 1:40AM | Last Updated: Dec 15 2017 11:17PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

भारत-मालदीव लष्करी युद्धाभ्यास संयुक्त सरावाला आज शनिवारी सुरुवात होत आहे. या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी मराठा रेजिमेंटच्या मैदानावर भारतीय जवानांनी सादर केलेल्या थरारक कसरतींनी डोळ्यांचे पारणे फेडले. या ठिकाणी वाहेदा गुरू खालसा घोषात मुंबई इंजिनिअरिंग ग्रुप  (पुणे) जवानांनी सादर केलेल्या शीख परंपरेच्या पराक्रमाची झलक दाखवली. 

संयुक्त लष्करी युद्धाभ्यास सराव शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाला मराठा लष्करी प्रशिक्षण केंद्राचे ब्रिगेडियर गोंविद कलवाड, मालदिव लष्कराचे कॅप्टन महंमद शिनान  उपस्थित होते. पथसंचलन कार्यक्रमानंतर दोन्ही देशांच्या जवानांसाठी आयोजित जवानांनी गटकानृत्यांतर्गत पराक्रमी शीख परंपरेचे दर्शन घडविले. 

जवानांनी ‘सव्वा लख दे इकबराबर’ गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. 12 जवानांनी तलवारबाजी, लाठ्याकाठ्या, आगीचे खेळ सादर केले. डोळ्यावर पट्टी बांधून जवानांच्या हात, मांडी, डोके, पाठीवरील काकडी कापण्याबरोबरच काठीने जवानाच्या कपाळावरील नारळ फोडण्याच्या प्रात्यक्षिकावेळी उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला. टोकदार खिळे, तलवारीवर झोपून पोटावर, पाठीवर घणाने विटा फोडण्याच्या प्रात्यक्षिकामुळे अंगावर रोमांच  आले. 

एकापेक्षा एक चित्तथरारक कवायती सादर करताना जवानांनी कपाळ, डोके, पाठीवर, छातीवर, पायावर ट्यूबलाईट व नारळ फोडून घेताना उपस्थितांच्या हृदयाचे ठोके चुकले. त्या जवानांच्या कसरती पाहून मालदीव जवानांनीही टाळ्यांच्या गजरात कौतुक केले. रेजिमेंटच्या बॅगबायपर वादकांनी संगीत सादर केले. कार्यक्रमारंभी दोन्ही देशांच्यावतीने हॅलिकॉप्टरद्वारे ध्वजसंचलन झाले.