Fri, Apr 26, 2019 09:26होमपेज › Belgaon › अपघातात तीन विद्यार्थी जागीच ठार

अपघातात तीन विद्यार्थी जागीच ठार

Published On: Jun 25 2018 1:46AM | Last Updated: Jun 24 2018 11:44PMमच्छे : प्रतिनिधी

कार व दुचाकी वाहन यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीन कॉलेज विद्यार्थी जागीच ठार झाल्याची दुर्घटना बेळगाव-खानापूर महामार्गावरील प्रभूनगर गावानजीक रविवारी सकाळी 11.30 वाजता घडली.

अथर्व अमोल जाधव (वय 17, रा. कोनवाळ गल्ली बेळगाव), हर्ष सुनील सावगावकर (वय 16, रा. मुजावर गल्ली), अमन आनंद कपलेश्‍वरी (वय 17, रा. अनसूरकर गल्ली) अशी मृतांची नावे आहेत. तिघे मित्र आज सकाळी बेळगावहून खानापूर-गणेबैल येथील भूतनाथ डोंगरावर स्वत:चे फोटोशूट करण्याकरिता गेले होते. हे सर्वजण फोटोशूट संपवून दुचाकीवरून बेळगावला येत होते. त्याचवेळी बेळगावकडून खानापूरकडे जाणारी कार आणि बेळगावकडे येणार्‍या दुचाकीची समोरासमोर धडक झाली.

या धडकेमध्ये कारच्या एका बाजूचा संपूर्ण चक्‍काचूर झाला तर दुचाकी सुमारे 100 फुटांपर्यंत उडून पडली.  या अपघातात हर्ष हा विद्यार्थी 50 फुटांवर फेकला गेला तर अथर्व महामार्गाच्या बाजूला पडला होता. तर अमन हा दुचाकीशेजारी रक्‍ताच्या थारोळ्यात पडून होता. तिघांच्याही डोक्याला गंभीर मार बसून मोठा रक्‍तस्राव झाला. यातच तिघेही जागीच ठार झाले. मयत विद्यार्थ्यांचे बूट 200 फुटांवर उडून पडलेले होते.  

घटनास्थळी ग्रामीण पोलिस ठाण्याचे डीएसपी बी. एस. भालचंद्र, सीपीआय नारायणस्वामी, फौजदार कृष्णवेणी यांनी पंचानामा केला. कारमालक ब्रह्मनगर बेळगाव येथील असून ते खानापूर येथे आपल्या मुलाला मुलगी पाहण्याकरिता कारमधून चालले असताना हा अपघात घडला. हर्ष सावगावकर हा हिंदवाडी येथील जैन कॉलेजमध्ये प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. अथर्व जाधव हा पिरनवाडी येथील जैन कॉलेजमध्ये प्रथम वर्षात डिप्लोमा करत होता. तर अमन कपलेश्‍वरी हा टिळकवाडी जीएसएस कॉलेजमध्ये प्रथम वर्षात शिकत होता. कारचालक अपघातानंतर पसार झाला आहे.