Thu, May 28, 2020 09:24होमपेज › Belgaon › किणेकरांसह तिघाजणांची उमेदवारी पवारांकडून घोषित

किणेकरांसह तिघाजणांची उमेदवारी पवारांकडून घोषित

Published On: Apr 23 2018 1:14AM | Last Updated: Apr 23 2018 12:44AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगाव दक्षिण, ग्रामीण आणि खानापूर या तीन मतदारसंघांतील उमेदवारांची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी रविवारी कोल्हापुरात केली. या तिन्ही मतदारसंघात तगडी प्रचार यंत्रणा राबवून जनतेपर्यंत पोहोचण्याचे काम केले जाईल, तेथील सर्व भाषिकांनीही  एकीकरण समितीच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन पवार यांनी केले. 

बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघातून प्रकाश मरगाळे, बेळगाव ग्रामीण मतदारसंघातून मनोहर किणेकर, खानापूर विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार अरविंद पाटील या नावांची घोषणा पवारांनी केली. याआधी मरगाळे व अरविंद यांच्या नावांची घोषणा ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांनी केली होतीच. विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने खा. शरद पवार हे रविवारी कोल्हापूर दौर्‍यावर आले आहेत. हॉटेल पंचशीलमध्ये सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची पवार यांनी बैठक घेतली. यानंतर पत्रकार बैठकीत पवार म्हणाले, बेळगावसह सीमाभागात डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र मध्यवर्ती एकीकरण समितीच्यावतीने कर्नाटक विधानसभा निवडणूक लढविण्यात येत आहे. उमेदवार निवडत असताना तालुका समितींकडून उमेदवारांची नावे देण्यासंबंधी सूचना करण्यात आल्या होत्या, ही नावे मध्यवर्ती एकीकरण समितीकडे आली. त्यातून या तीन उमेदवारांची निवड झाली आहे.

Tags : Belgaum, Three, people, including ,Kinekar, nominated, Pawar