Thu, Jul 18, 2019 04:57होमपेज › Belgaon › तीन कार्यालये बेळगावला हलवणार

तीन कार्यालये बेळगावला हलवणार

Published On: Aug 01 2018 1:21AM | Last Updated: Aug 01 2018 12:16AMबंगळूर : प्रतिनिधी

वेगळ्या उत्तर कर्नाटक राज्याची मागणी योग्य नाही. प्रत्येक जिल्ह्याचा आठवड्यातून दोन दिवस दौरा हाती घेतला जाईल. बेळगावातील सुवर्णसौधमध्ये प्रमुख तीन खाती स्थलांतरित करण्याची घोषणा मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी मंगळवारी केली. 

उत्तर कर्नाटक आंदोलन समिती शिष्टमंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. उत्तर कर्नाटकावर अन्याय झाल्याचा आरोप होत आहे. त्याकरिता बेळगावात बैठक घेऊन चर्चा केली जाईल. अन्याय झाला असेल तो दूर केला जाईल. पुढील आठवड्यापासूनच दोन दिवसांचा दौरा केला जाईल. तेथील लोकांच्या समस्या जाणून प्राधान्याने सोडविल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

याआधी मुख्यमंत्रीपदी असताना उत्तर कर्नाटकाच्या विकासासाठी दीड हजार कोटी रुपये राखीव ठेवले होते. त्यावेळी निधी राखीव ठेवणारा पहिलाच मुख्यमंत्री असल्याची लोकप्रियता मिळविली होती. आताही या भागाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. पण, याकरिता उत्तर कर्नाटक वेगळ्या राज्याची मागणी करणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. 

राज्यातील शेतकर्‍यांची कर्जमाफी केली आहे. याचा सर्वाधिक लाभ उत्तर कर्नाटकातील शेतकर्‍यांना मिळणार आहे. गत सरकारच्या काळातील शेतकर्‍यांची 4 हजार कोटींची कर्जही माफ करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आणखी काही योजना उत्तर कर्नाटकासाठी आखल्या आहेत. पूर्ण बहुमत मिळाले तर पूर्ण कर्जमाफी देण्याचे जाहीर केले होते. पण, पक्षाला केवळ 37 जागा मिळाल्या तरी धडपड करून 49 हजार कोटींची कर्जमाफी केली आहे. 

उत्तर कर्नाटकातील शेतकरी आपल्याला निवडणूक काळात विसरले, असे विधान केले होते. पण, शेतकर्‍यांविषयी कधीच अपशद्ब वापरले नाहीत. विरोधकांनी शेतकर्‍यांना भडकविण्याचे कामा केले आहे. आपल्याविरोधात शेतकरी नेते आंदोलन करत आहेत. पण, ते योग्य नसल्याचेमत कुमारस्वामींनी व्यक्‍त केले.

कुमारस्वामींचा ‘यू’ टर्न

दोनच दिवसांपूर्वी उत्तर कर्नाटकातील लोकांनी आपल्याला मतदान केले नसल्याचे कुमारस्वामींनी सांगितले होते. नेमके त्याउलट विधान कुमारस्वामींनी आंदोलकांच्या शिष्टमंडळापुढे केले. गतवेळी मुख्यमंत्री असताना सर्वाधिक ग्रामवास्तव्य केले. बेळगावच्या बाबतीत महाराष्ट्राकडून कुरघोडी केली जाते. त्यासाठीच तेथे सुवर्णसौध उभारली. तेथे अधिवेशन भरविण्याचा निर्णय घेतला. उत्तर कर्नाटकात निवडणूक प्रचारासाठी गेल्यानंतर मोठ्या संख्येने लोक जमा होतात. आपल्या पक्षातील नेत्यांचा तेथे प्रभाव नसल्याने त्यांना जिंकता आले नसल्याचे कुमारस्वामींनी सांगितले.