होमपेज › Belgaon › ‘एसआयटी’चा दावा : परशुराम अजूनही बेळगावातच, चौकशी पथक सिंदगीत

लंकेश, पानसरे, कलबुर्गी हत्यांतील पिस्तूल एक, मारेकरी भिन्‍न

Published On: Jun 23 2018 1:20AM | Last Updated: Jun 23 2018 1:20AMबंगळूर : प्रतिनिधी, वृत्तसंस्था

पत्रकार गौरी लंकेश यांच्यावर ज्या पिस्तूलमधून गोळ्या झाडण्यात आल्या, तेच पिस्तूल कॉ. गोविंद पानसरे आणि डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले असले तरी मारेकरी वेगवेगळे आहेत, असे विशेष तपास पथकाचे (एसआयटी) म्हणणे आहे. या तिघांच्या हत्यांसह डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमागेही एकच सूत्रधार असण्याची शक्यता आहे; पण गोळ्या चालवणारे हात वेगवेगळे होते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

पथकातील  एका अधिकार्‍याकडून मिळालेल्या माहितीनुसार, परशुराम वाघमारेचा संबंध फक्‍त गौरी हत्याकांडाशी आहे. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येशी त्याचा संबंध नाही. एसआयटीने जेव्हा परशुरामवर डॉ. कलबुर्गी हत्येबाबत दबाव टाकला, त्यावेळी त्याने एसआयटीलाच उलट प्रश्‍न केला. गौरी हत्याकांडाची जबाबदारी मी घेतलीच आहे. इतर तिन्ही हत्याही मीच केल्या असत्या तर त्यांची जबाबदारी घेण्यात मला भीती वाटली असती का?, असा प्रश्‍न परशुरामने चौकशीदरम्यान एसआयटी अधिकार्‍यांना 
केला. त्यामुळे अधिकारीही निरुत्तर झाले, अशी माहितीही सूत्रांनी दिली.

पथक सिंदगीत

बुधवारी सायंकाळी बेळगावात दाखल झालेले एसआयटी अधिकारी शुक्रवारी सिंदगीत दाखल झाले. त्यांनी परशुरामच्या घरी तसेच त्याच्या मित्रांकडे परशुरामबाबत माहिती घेतली. पथकात एकूण पाच अधिकारी असून, ते परशुरामला बेळगावमध्येच ठेवून सिंदगीला जाऊन आले. त्यांनी परशुरामच्या कुटुंबीयांचीही चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. गुरुवारी या पथकाने अनमोड-खानापूरच्या जंगलात परशुरामने शस्त्रप्रशिक्षण घेतलेल्या स्थळाचा शोध चालवला होता.

एसआयटी ‘त्या’ तिघांच्या मागावर

गौरी लंकेश यांना गोळ्या घाल, असे परशुराम वाघमारेला सांगणार्‍या तिघांचा शोधही एसआयटी घेत आहे.

वाघमारेने आपल्या जबानीत या तिघांचा उल्लेख केला आहे. त्या तिघांना आपण फक्‍त पाहिले होते, असे वाघमारेने सांगितले आहे. वाघमारेने केलेल्या वर्णनाप्रमाणे एसआयटीने त्या तिघांची सहा रेखाचित्रे तयार केली आहेत. विविध माध्यमातून त्या तिघांचा छडा लावण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याचे एसआयटीने सांगितले. 

त्या तिघांपैकी एकाने देशी बनावटीचे पिस्तूल मला दिले होते. गौरी यांच्या हत्येनंतर एकाने ते माझ्याकडून परत घेतले, अशी माहिती वाघमारेने एसआयटीला दिली आहे. हे पिस्तूल हाती लागल्यास त्या तिघांना शोधणे सोपे जाईल.  त्यासाठी आम्ही युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहोत, असे एसआयटीमधील सूत्रांनी सांगितले. एसआयटीने कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील काही ठिकाणी भेट दिली आहे.