Thu, Apr 25, 2019 16:00होमपेज › Belgaon › अपघातात तीनजण जागीच ठार

अपघातात तीनजण जागीच ठार

Published On: Jun 17 2018 1:35AM | Last Updated: Jun 17 2018 12:30AM खानापूर : वार्ताहर

बेळगाव-गोवा महामार्गावर नादुरुस्त झाल्यामुळे थांबलेल्या ट्रकने तीन युवकांचा बळी घेतला. खानापूर तालुक्यातील माडेगुंजीजवळ शुक्रवारी मध्यरात्री हा भीषण अपघात झाला. थांबलेला ट्रक अंधारात न दिसल्याने दुचाकीवरून जाणार्‍या युवकांनी ट्रकला मागून धडक दिली. त्यात तिघेही ठार झाले.करीम मकतूम शेख (वय 30), शानूर सलीम शेख (23, दोघेही रा. माडेगुंजी) आणि पुंडलिक मल्लाप्पा कोट्टनगी (28, रा. हलकी, ता. सौंदत्ती) अशी मृतांची नावे आहेत. शेख यांच्या घरी ईदपूर्वीची रात्र काळरात्र ठरली.

तिघेही मित्र रात्री एकच्या सुमारास दुचाकीवरून लोंढ्याहून गुंजीला येत होते. लोंढ्याहून गुंजीच्याच  दिशेने येणारा ट्रक गुंजीपासून एक कि.मी.वर उभा होता. मात्र, अंधारात तो दुरून दिसत नव्हता. त्यामुळे भरधाव असणार्‍या दुचाकीने ट्रकच्या मागच्या बाजूला धडक दिली. त्यात तिन्ही युवकांच्या डोक्याला जबर मार लागला. अतिरक्तस्त्रावाने त्यांचा जागीच मृत्यू झाला. शवचिकित्सा केल्यानंतर त्यांचा मृत्यू रात्रीच झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

करीम आणि शानूर हे दोघे नजीकच्या वाठरे गावातील बकरी फार्ममध्ये कामाला होते. पुंडलिक तीन महिन्यांपूर्वी जोमतळे येथील वृक्ष तोडणीच्या कामासाठी गेला होता. शनिवारी ईद असल्यामुळे करीम आणि शानूर गुंजीला परत येत होते. तर त्यांच्यासमवेत पुंडलिकही गुंजीला येत होता.  पण, ईदसाठी घरी पोचण्यापूर्वीच अपघातांत त्यांचा बळी गेला.
करीमच्या पश्‍चात पत्नी, शानूरच्या पश्‍चात आई-वडील, भाऊ तर पुंडलिकच्या पश्‍चात पत्नी, आई-वडील व दोन महिन्यांचा मुलगा असा परिवार आहे. पुंडलिकचे अलिकडेच लग्न झाले होते. 

तिन्ही मृतदेहांची खानापूर सरकशारी रुग्णालयात उत्तरीय तपासणी करुन शनिवारी दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.  पोलीस उपनिरिक्षक संगमेश होसमणी अधिक तपास करीत आहेत.

रस्ता अरुंद

बेळगाव-पणजी हा राष्ट्रीय महामार्ग आहे. मात्र बेळगाव ते खानापूर इतकाच पट्टा दुपदरी आहे. खानापूर ते लोंढ्यापर्यंतचा रस्ता घनदाट जंगलात गेला असल्याने हा पट्टा अतिशय अरुंद आहे. दोन वाहने कशीतरी पार होतात. त्यातही माडेगुंजीत तर महामार्ग गावातून जातो. इथे महामार्ग फक्त नावापुरता आहे. त्याची रुंदी केवळ 30 फूट आहे.