निपाणी : प्रतिनिधी
नगरपालिकेच्या 31 ऑगस्ट रोजी होणार्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी अर्जांची छानणी करण्यात आली. छानणीत 159 अर्जांपैकी 3 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले असून आता निवडणूक रिंगणात 31 जागांसाठी 156 उमेदवार उरले आहेत. गुरूवार 23 पर्यंत अर्ज माघारीची वेळ असल्याने माघारीनंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
निवडणूक अधिकारी मोहन जिडवीहाळ, एल. आर. रूडगी, एम. जे. दासर व एम. बी. पुजारी यांच्या कक्षात सोमवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. वॉर्ड क्र. 8 मधून स्वाती नितीन गुरव, वॉर्ड क्र. 10 मधून राजू दत्तू भगत यांचा अर्ज भाजप पक्ष म्हणून भरण्यात आला होता. पण अर्जाला बी-फॉर्म न जोडल्याने अर्ज अवैध ठरविण्यात आले. वॉर्ड क्र. 16 मधून डॉ. जसराज गिरे यांनी दोन अर्ज भरल्याने एक अर्ज छानणीत अवैध ठरविण्यात आला. त्यामुळे आता निवडणुकीत रिंगणात 156 उमेदवार आहेत.
अर्ज माघारीसाठी तीन दिवसांचा कालावधी असून एक दिवस बकरी ईदची सुट्टी आहे. त्यामुळे आपल्या विरोधातील उमेदवाराच्या माघारीसाठी आता चर्चा व घडामोडींना वेग आला आहे. भाजपने 31 पैकी 30 वॉर्डामधील उमेदवारांना बी-फॉर्म देऊन पक्ष चिन्हावर उभे केले आहे. वॉर्ड क्र. 11 मध्ये पक्षातीलच दोन उमेदवार रिंगणात असल्याने कोणालाही बी-फॉर्म न देता तेथे मैत्रीपूर्ण लढत होत आहे.
काँग्रेसने सर्व वॉर्डात उमेदवार पुरस्कृत केले आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे. सर्व वॉर्डातील उमेदवारांनी व्यक्तिगत संपर्क, चर्चा, बैठकांवर जोर दिला आहे. चहापाणी, जेवणावळींनाही सुरूवात झाली आहे. शहरात सर्वत्र निवडणुकीचीच चर्चा ऐकावयास मिळत आहे. मतपत्रिकेवर प्रथम राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार त्यानंतर राज्यात नोंदणी असलेल्या पक्षाचा उमेदवार व नंतर इंग्रजी आद्याक्षराप्रमाणे अपक्ष उमेदवारांचे नाव असणार आहे. अर्ज माघारीनंतर अपक्षांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. एकच चिन्ह अधिक उमेदवारांनी मागितले असल्यास चिठ्ठी टाकून लॉटरी पद्धतीने चिन्ह वाटप केले जाणार आहे. आता अर्ज माघार कोण घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
31 वॉर्डांसाठी 52 मतदान केंद्रे
निपाणी : मधुकर पाटील
निपाणी पालिकेसाठी 31 वॉर्डांसाठी 52 मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. 49 हजार 932 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात पुरूष 24 हजार 783 तर महिला मतदार 25 हजार 148 आहेत.
मतदान केेंद्रे व एकुण मतदारसंख्या पुढीलप्रमाणे- वॉर्ड क्र. 1 सरकारी कन्नड शाळा (1030), वॉर्ड क्र. 2 कस्तुरबा बालभवन शाळा व उपनोंदणी कार्यालय दोन ठिकाणी मिळून (1850), वॉर्ड क्र. 3 सरकारी शाळा सिध्दीविनायक मंदिर (1343), वॉर्ड क्र. 4 गोमटेश इंग्लिश मेडियम स्कूल दोन खोलीमध्ये (1768), वॉर्ड क्र. 5 सरकारी शाळा आश्रयनगर (1079), वॉर्ड क्र. 6 मराठी शाळा जत्राट वेस नंबर 5 मधील दोन खोल्या (1881), वॉर्ड क्र. 7 एपीएमसी सोसायटी दोन खोलीमध्ये (2027), वॉर्ड क्र. 8 नगरपालिका ग्रंथालय दोन खोलीमध्ये (1590), वॉर्ड क्र. 9 न. पा. कार्यालय (1226), वॉर्ड क्र. 10 सरकारी शाळा हरिनगर दोन खोलीमध्ये (1676), वॉर्ड क्र. 11 सरकारी कन्नड शाळा दोन रूममध्ये आश्रयनगर (1898), वॉर्ड क्र. 12 मराठी शाळा आश्रयनगर दोन खोलीमध्ये (1583), वॉर्ड क्र. 13 एपीएमसी कार्यालय व आयटीआय दोन खोलीमध्ये (2422), वॉर्ड क्र. 14 चिकोडी रोड व बागेवाडी गोडावून शाळा क्रं. 1 मध्ये (1803), वॉर्ड क्र. 12 सरकारी शाळा चिराग गल्ली दोन खोलीमध्ये (2125), वॉर्ड क्र. 16 सरकारी शाळा दत्त खुले नाट्यगृह दोन खोलीमध्ये (1770), वॉर्ड क्र. 17 नगरपालिका प्रौढ शाळा (1311), वॉर्ड क्र. 18 व्हीएसम स्कूल शिंत्रे कॉलनी (1224), वॉर्ड क्र. 19 सरकारी शाळा हरिनगर (1459), वॉर्ड क्र. 20 शिंदेनगर सरकारी शाळा (1000), वॉर्ड क्र. 21 शादीमहल चिमगावकर गल्ली व अंगणवाडी शाळा दोन खोलीमध्ये (2181), वॉर्ड क्र.22 शिषू विहार घट्टे गल्ली, नूतन मराठी शाळा घट्टे गल्ली (1722), वॉर्ड क्र. 23 सरकारी उर्दू शाळा दोन खोलीमध्ये (1849), वॉर्ड क्र. 24 विद्यामंदिर दोन खोलीमध्ये (2004), वॉर्ड क्र. 25 सरकारी कन्नड शाळा म्युनिसीपल हायस्कूल (1381), वॉर्ड क्र. 26 सरकारी उर्दू शाळा आझादनगर (1165), वॉर्ड क्र. 27 सरकारी मराठी शाळा आंबेडकरनगर पूर्व भाग दोन खोलीमध्ये (1513), वॉर्ड क्र. 28 चर्मकार समाज समुदाय भवन दोन ठिकाणी (2070), वॉर्ड क्र. 29 कन्नड शाळा बिरोबा माळ व यरनाळ रोड मराठी शाळा दोन ठिकाणी (1472), वॉर्ड क्रं 30 पाथरूट समाज भवन कागवाडे प्लॉट (609), वॉर्ड क्र. 31 सरकारी उर्दू शाळा तीन ठिकाणी मिळून (2746).
एकुण 52 केंद्रांपैकी 21 केंद्रे अतिसंवेदनशील, 23 संवेदनशील आहेत.