Thu, May 23, 2019 21:22
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › महाराष्ट्र बस बंदचा तीन राज्यांना फटका

महाराष्ट्र बस बंदचा तीन राज्यांना फटका

Published On: Jun 09 2018 1:33AM | Last Updated: Jun 08 2018 7:50PMनिपाणी : प्रतिनिधी

महाराष्ट्र बस कर्मचार्‍यांची सरकारने केलेली वेतनवाढ अमान्य असल्याच्या कारणामुळे गुरूवारी मध्यरात्रीपासून कर्मचार्‍यांनी बेमुदत बंद पुकारला आहे. त्याचा फटका कर्नाटकालाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. महाराष्ट्र बस कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या बंदमुळे महाराष्ट्रासह कर्नाटक व गोवा या तीन राज्यांना फटका बसला आहे.

निपाणी आगाराला शुक्रवारी एकह दिवसात 12 लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला. आंतरराज्य बस वाहतूक बंद राहिल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले आहेत. महाराष्ट्र सरकार व कामगार संघटनेच्या मागणीबाबत चर्चा फिसकटल्याने बंद चिघळला आहे. त्यामुळे शुक्रवारी  निपाणीतून पुणे, मुंबई, कोल्हापूर, कागल, गडहिंग्लज, मुरगूड, कापशी, आजरा, पणजी मार्गावरील बससेवा बंद होती.
बंदचा परिणाम निपाणी आगारावर अधिक दिसून आला.

संपामुळे खासगी वाहने व वडाप धारकांची चंगळ दिसून आली. बससेवा बंदमुळे बसस्थानक परिसरात सकाळी खासगी वाहने लावण्यात आली होती. बस तिकीट दरापेक्षा अधिक दर देऊन प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. शुक्रवारी दिवसभर  खासगी वाहने तुडूंब भरुन जात होती. पाऊस चांगला झाल्याने बी-बियाणे व  अन्य साहित्य खरेदीसाठी आलेल्या शेतकर्‍यांनाही फटका बसला. कागल, मुरगूड, कापशी, गडहिंग्लजनंतर निपाणी येथे मोठी बाजारपेठ आहे.

व्यापार व खरेदीसाठी येणार्‍यांना खासगी वाहनांचाच आधार घ्यावा लागला. खासगी वाहनधारकांनी कोल्हापूरसाठी बसचे 52 रूपये तिकीट दर असताना चक्‍क 100 ते 150 रुपये आकारले. गडहिंग्लज, कागलकडे जाणार्‍या प्रवाशांकडून 50 ते 60 रुपये घेण्यात आले. बंदमुळे  कर्नाटकातील विविध आगारांसह निपाणी आगारातून धावणार्‍या बससेवा बंद झाल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला. तीन राज्यांतर्गत होणारी आंतरराज्य बस वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव परिवहन खात्याने थांबविली आहे.  त्यामुळे निपाणी आगाराला सुमारे 12 लाख रुपये नुकसानीला सामोरे जावे लागल्याची माहिती आगार व्यवस्थापक एस. संदीपकुमार यांनी दिली.

खासगी वडाप व्यावसायिकांची मोठी उलाढाल

बंदमुळे तीन राज्यांतर्गत बससेवा बंद राहिल्याने खासगी वडाप धारकांनी मोठ्याप्रमाणात फायदा उचचला. महाराष्ट्रातून बंगळूर, गोव्याकडे तर कर्नाटकातून महाराष्ट्रातील पुणे, मुंबईसह अन्यत्र धावणार्‍या खासगी वाहनधारक व लक्झरी बसधारकांनी बंदचा पुरेपूर फायदा घेतला. दिवसभर  खासगी वडाप व्यवसायिकांचीही लाखांवर उलाढाल झाली.