Tue, Mar 19, 2019 20:33होमपेज › Belgaon › आयजीपींना ‘हिंडलगा’तून धमकी

आयजीपींना ‘हिंडलगा’तून धमकी

Published On: Apr 27 2018 12:52AM | Last Updated: Apr 27 2018 12:18AMबेळगाव ः प्रतिनिधी  

उत्तर विभागाचे पोलिस महानिरीक्षक अलोककुमार यांना चक्‍क हिंडलगा कारागृहातील कैद्याने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. शिवाय धमकीचा एसएमएसही पाठवला आहे. स्वतःला नक्षलवादी म्हणवणारा हा कैदी खुनाच्या गुन्ह्याखाली शिक्षा भोगत असून, आयजीपींनी एपीएमसी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. कैद्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत. 

आयजीपी अलोककुमार यांच्या मोबाईलवर दि. 21 रोजी रात्री साडेनऊ वाजता 7090914584 या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधण्यात आला.  निनावी व्यक्‍तीने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच, आयजीपी तुझ्या अंगावरचे कपडे उतरवू, तू काय डीसीपी, मी एम. एस.अलीखान नक्षलीस्ट, आरडीएक्स, एके 56 आणि नैट्रोग्लिसरीन आणि ग्रॅनाईट स्पेशालिस्ट आहे, असा एसएमएसही पाठविण्यात आला.

त्यानंतर अलोककुमार यांच्या सहाय्यकाने त्यांच्या वतीने एपीएमसी पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांनी तत्काळ तपास यंत्रणा कामाला लावून शोध घेतला असता हा निनावी कॉल हिंडलगा कारागृहातून आल्याचे स्पष्ट झाले. हिंडलगा कारागृहातील जन्मठेप शिक्षा भोगणार्‍या कैद्याकडून ही धमकी देण्यात आली आहे. शहजाय असे त्या कैद्याचे नाव असून, तो मूळचा केरळचा आहे. मंगळूर येथे खून प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. नंतर त्याला जन्मठेप झाली. 

एपीएमसी पोलिस व हिंडलगा कारागृह अधिकार्‍यांकडून त्यानंतर कसून तपासणी सुरू आहे.  शहजायकडून मोबाईल फोन, सीमकार्ड जप्त करण्यात आला आहे. अधिक चौकशीसाठी त्याला बॉडीवॉरंटवर ताब्यात घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.

छापे पडूनही मोबाईल कुठून?

हिंडलगा कारागृहात अगदी पंधरा दिवसांपूर्वी तत्कालीन पोलिस आयुक्त डॉ. राजप्पा यांनी छापे टाकून कैद्यांकडून सिमकार्ड, टीव्ही, पंखा, खाद्यपदार्थ आणि तंबाखूही जप्त केला होता. तरीही आयजीपी अलोककुमार यांना धमकी देण्यासाठी शहजाय या कैद्याकडे मोबाईल कुठून आला, हा प्रश्न आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांचीही चौकशी होणार का हा प्रश्न आहे.

Tags :belgaon, karnataka, belgaon, hindalaga,