Tue, May 21, 2019 18:10होमपेज › Belgaon › यंदा १४ हजार मुले शाळाबाह्य

यंदा १४ हजार मुले शाळाबाह्य

Published On: Aug 07 2018 12:58AM | Last Updated: Aug 06 2018 10:09PMबेळगाव : प्रतिनिधी

व्यापक जागृती मोहीम हाती घेतली तरी यंदा 14,192 मुले शाळेपासून दूर राहिली आहेत.  सक्‍तीच्या शिक्षणाचा कायदा (आरटीई) जारी झाल्यानंतर शाळाबाह्य मुलांना शाळेत पुन्हा प्रवेशासाठी मोहीम राबविण्यात आली आहे. घरोघरी जाऊन शाळेपासून दूर राहिलेल्यांची माहिती घेतली जात आहे. तरीही दरवर्षी दहा हजारपेक्षा अधिक मुले शाळेपासून दूर राहात आहेत. ही सर्व मुले सक्‍तीच्या शिक्षणापासून वंचित आहेत. 

गत शैक्षणिक वर्षात 17,005 मुले शाळेपासून दूर होती. त्यानंतर 13,436 मुलांना शाळेता आणण्यात शिक्षण खाते यशस्वी ठरले होते. ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने हाती घ्यावी लागते. पण, शाळाबाह्य मुले परत आल्यानंतर त्यांना पूर्ण प्रमाणात पारंपरिक शिक्षण उपलब्ध होत नाही. जागृती मोहिमेनंतरही गतवर्षी 3,569 मुलांना शाळेत पुन्हा प्रवेश देण्यात अपयश आले. ही समस्या यंदाही कायम आहे. शाळाबाह्य मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे प्रयत्न खात्याकडून होत आहेत. 

शैक्षणिकदृष्ट्या मागास असणार्‍या जिल्ह्यांमध्ये शाळाबाह्य मुलांची संख्या अधिक आहे. दहावी, बारावीत शेवटच्या स्थानांवर असणार्‍या जिल्ह्यांमध्ये शाळाबाह्य मुलांचे प्रमाण अधिक आहे. कोडगू जिल्ह्यात यंदा 20 मुले शाळाबाह्य आहेत. गतवर्षी ही संख्या 46 होती. त्यानंतर तुमकूर (32), रामनगर (32), मंगळूर (49) आणि उडपी (52) या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.

सर्वाधिक शाळाबाह्य मुलांच्या बाबतीत बळ्ळारी (3,240) अग्रस्थानी आहे. त्यानंतर बिदर (1,352), बंगळूर दक्षिण (1,205), गुलबर्गा (984) आणि हावेरी (907) यांचा क्रमांक आहे. बेळगावसह चिकोडी, धारवाड, कारवार, बागलकोट, रामननगर, बंगळूर उत्तर, चिक्‍कमगळूर, गुलबर्गा, यादगिरी, कोप्पळ, मंड्या, रायचूर, तुकमूर, मधुगिरी, शिर्शी शैक्षणिक जिल्ह्यांनी या बाबतीत यंदा प्रगती केली आहे.