Mon, May 20, 2019 08:27होमपेज › Belgaon › तीस रुपयांत शंभर लिटर शुद्ध पाणी

तीस रुपयांत शंभर लिटर शुद्ध पाणी

Published On: Jun 21 2018 1:26AM | Last Updated: Jun 20 2018 10:39PMबेळगाव : प्रतिनिधी

केवळ तीस रुपयांत शंभर लिटर पाण्याचे शुद्धीकरण करता येणे शक्य आहे. बेळगावातील अभियंता निरंजन कारगी याने ही किमया साधली आहे. त्याने बनविलेल्या फिल्टरमुळे पाण्यातील 80 टक्के जीवाणू नष्ट होतात. 

देशविदेशातील विविध कंपन्यांचे लक्ष त्याने वेधले असून आता मोठ्या प्रमाणात फिल्टरला मागणी वाढत आहे. याद्वारे निरंजन याने स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला आहे. ‘अल्ट्राफिल्टरेशन मेम्ब्रेन’ तंत्रज्ञानाचा वापर त्याने फिल्टरसाठी केला आहे. बोटाच्या आकाराचा फिल्टर निरंजन याने बनविला आहे. हा फिल्टर बाटलीला बसवून ती उलटी केल्यास पाणी शुद्ध होऊन बाहेर पडते. अ‍ॅक्टिवेटेड कार्बनचा वापर यामध्ये करण्यात आला आहे. पाणी शुद्धीकरणाबरोबरच 80 टक्के जीवाणूही फिल्टर नष्ट करते. अशुद्ध पाण्याला असणारा रंग आणि वासही या शुद्धीकरणानंतर निघून जातो.

एका फिल्टरने 100 लिटर पाण्याचे शुद्धीकरण करता येते. हे पाणी पिण्यासाठी योग्य असते. जीएसटीसहित एका फिल्टरची किंमत केवळ तीस रुपये आहे. या दरामध्ये बाजारपेठेत कोणत्याही प्रकारचा फिल्टर उपलब्ध नाही. 

अमेरिकेतील वाहिनीवर तसेच विविध देशांमध्ये फिल्टरबाबतचे वृत्त प्रसारित झाले. त्यानंतर फिल्टरसाठी चौकशी केली जात आहे. आफ्रिका, कतार आणि सिंगापूरमधील काही कंपन्यांनी फिल्टर खरेदी केले आहेत. फ्रान्स आणि न्यूझीलंडमधील कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. प्रात्यक्षिके पाहिल्यानंतर भारतीय लष्कराने एक हजार फिल्टरची ऑर्डर दिली आहे. 

कोलकात्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटने आपल्या प्रयोगशाळेत संशोधनासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचे सांगितले आहे. राज्य सरकारतर्फे आयोजित ‘एलिवेट 100’ मेळाव्यात पुरस्कार मिळाला. नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत मिळाली आहे. केवळ 12 हजार रुपये गुंतवून फिल्टर तयार करण्यास सुरवात केली. ‘निर्नल’ या नावाची कंपनी सुल केली. आगामी काळात सुधारित फिल्टर तयार करण्याचा मानस असल्याचे निरंजन सांगतो.