Fri, Apr 26, 2019 09:46होमपेज › Belgaon › सतीश जारकीहोळींकडून तेरा ‘पीएं’ना नारळ

सतीश जारकीहोळींकडून तेरा ‘पीएं’ना नारळ

Published On: Jun 14 2018 1:33AM | Last Updated: Jun 13 2018 10:02PMबेळगाव : प्रतिनिधी 

बंधू लखन जारकीहोळी यांची टिका आणि नुकत्याच झालेल्या निवडणूक निकालात घटलेले मताधिक्य यामुळे आमदार सतीश जारकीहोळी यांनी आपल्या 13 पी.ए. ना (स्वीय सहाय्यक) नारळ दिला आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी गोकाकचे उद्योजक लखन जारकिहोळी यांनी यमकनमर्डी मतदारसंघातील नागरिक स्वीय सहाय्यकांच्या (पीए) कारभाराला कंटाळले आहेत,त्यामुळे हा मतदारसंघ ‘पीए’मुक्त करण्यासाठी आपण  निवडणूक लढवित असल्याचे म्हटले होते. बंधू लखन यांनी केलेल्या वक्तव्याची गंभीर दखल घेऊन आ.सतीश जारकीहोळी यांनी या ‘पीए’ची अक्षरशः हकालपट्टी केली. जवजवळ  दोन दशके स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत असलेले, यमकनमर्डी मतदारसंघाची धुरा सांभाळणारे नातेवाईकातीलच विद्याधर नायकर यांना आ.सतीश यांनी घरी पाठवून दिले आहे.

यमकनमर्डी मतदारसंघ व बेळगाव, गोकाक शहरात ‘नॉन सावकार पीए’ म्हणून इतर 12 पीएंची आ.सतीश यानी  एकाचवेळी हकालपट्टी केली आहे. उर्वरित तीन पीएंना मतदारसंघात पाय ठेवू नका, कोणत्याही अधिकार्‍यांशी आपले नाव सांगत संपर्क साधू नका, अशी ताकीद दिली आहे.

आपले  नाव  सांगत  अधिकार्‍यांची छळणूक करणे, गोंधळ माजविणे यासारखे गैरकृत्य करणार्‍या पीएंची हकालपट्टी केल्यानंतर आ.सतीश यानी  काही अनपेक्षित खर्चावर नियंत्रण आणले आहे.

बेळगाव जिल्ह्यातील  अत्यंत प्रतिष्ठीत पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणार्‍या सतीश शुगर्स अ‍ॅवॉर्डअंतर्गत शरीरसौष्ठव स्पर्धा, सांस्कृृतिक कार्यक्रम, कृषी, क्रीडा यासारखे उपक्रम न भरविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.उपरोक्त कार्यक्रमांसाठी पेंडाल, स्टेज, केटरिंगची व्यवस्था पाहणारे गोकाकचे रियाज चौगला व सहकार्‍यांना ‘तुमची संगत आता नको’ असा संदेश धाडला आहे. मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून नव्या पिढीला  सशक्त बनविण्यासाठी प्रयत्न करीत असलेल्या आम्हाला  मिळालेले बक्षीस हे केवळ 2850 मतांचे असे अत्यंत भावूकपणे आ.सतीश आपल्या  नातेवाईकांसमोर सांगत होते.  त्याचे कारण असे की,  यममकनमर्डी मतदारसंघातून   सतीश जारकिहोळी यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार मारूती अष्टगी याना केवळ 2850 मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता.