Mon, Aug 19, 2019 05:11



होमपेज › Belgaon › मंगल कार्यालयांत तृतीयपंथीयांची घुसखोरी

मंगल कार्यालयांत तृतीयपंथीयांची घुसखोरी

Published On: Dec 02 2017 12:40AM | Last Updated: Dec 01 2017 9:01PM

बुकमार्क करा





बेळगाव : प्रतिनिधी

रेल्वेतून प्रवास करताना अथवा सार्वजनिक ठिकाणी अनेकवेळा तृतीयपंथीयांच्या कारनाम्यांची करामत पाहायला मिळते. आता  बेळगावकरांना मंगलकार्यादरम्यान तृतीयपंथीयांच्या धक्कादायक अनुभवांचा सामना करावा लागत आहे. मंगल कार्यालयात तृतीयपंथीयांची घुसखोरी वधू-वर पक्षांना चिंतेचा विषय बनला आहे.

तृतीयपंथीयांसंदर्भात अनेक दंतकथा प्रचलित आहेत. एखाद्या शुभप्रसंगी दारात आलेल्या तृतीयपंथीयाला रिकाम्या हाताने परत पाठविले तर अपशकून मानले जाते. त्यामुळे दरवाजात आलेल्या तृतीयपंथीयांना रिकामे पाठविले जात नाही.

आपल्याविषयी समाजात असलेल्या विशिष्ट धाकाची जाणीव ठेवून तृतीयपंथीयांनी आपल्या उदरनिर्वाहाच्या वेगवेगळ्या वाटा चोखाळल्या आहेत. अनेक तृतीयपंथी उच्चशिक्षित झाले आहेत. अनेकजण समाज आणि राजकारणात गुंतले आहेत. दरम्यान, देशभरातील लाखो तृतीयपंथीय आजही पूर्वापार चालत आलेल्या चालीरितीनुसार दुसर्‍यांच्या आधारावर जीवन जगत आहेत.

सार्वजनिक ठिकाणी तृतीयपंथीयांच्या कारनाम्यांचा प्रत्येकालाच अनुभव येतो. काही समाजात शुभप्रसंगी तृतीयपंथीयांना विशेष आमंत्रित करुन नाचगाण्यांचा कार्यक्रम केला जातो. सध्या विवाह सोहळ्यांचा हंगाम सुरु झाला असून मंगल कार्यालयांमधून तृतीयपंथीयांची घुसखोरी सर्वांना धक्का देणारा आणि चर्चेचा विषय बनला आहे. बेळगाव शहरात तृतीयपंथीयांची संख्या लक्षणीय आहे. मात्र आतापर्यंत त्यांच्याकडून नागरिकांना त्रास देण्याचे प्रकार घडलेले नाहीत. त्यामुळे बेळगावकरांच्या मनात त्यांच्याविषयी कधीही आकसाची भावना नव्हती. मात्र अलीकडच्या काही दिवसांत मंगल कार्यालयातून तृतीयपंथीयांची घुसखोरीने सार्‍यांनाच चकित करुन सोडले आहे.

विवाहसमारंभात ‘बिनबुलाये मेहमान’ बनून येणारे तृतीयपंथी वधू-वर पक्षाकडून खुशाली मिळविण्यासाठी चढाओढ करु लागले आहेत. हवी ती रक्कम न दिल्यास शिवीगाळ करण्यापर्यंत त्यांची मजल जाऊ लागली आहे. शुभकार्यात विघ्न नको याच भावनेतून वधू-वर पक्ष त्यांच्या तावडीतून आपली सुटका करुन घेत आहेत. मंगल कार्यालयात त्यांना प्रवेशबंद करण्याचे धाडस व्यवस्थापनात नाही. त्यामुळे तृतीयपंथीयांची घुसखोरी चिंतेचा विषय बनला आहे.

बहुरूपींना कसे रोखणार?

समाजाने आम्हाला वाळीतच टाकल्याची खंत तृतीयपंथीय व्यक्त करतात. तृतीयपंथीयांना नोकरीही कोणी देत नाही.त्यामुळे बहुसंख्य तृतीयपंथीय दुसर्‍यांसमोर हात पसरुन आपला उदर निर्वाह चालवितात.मात्र काही टवाळखोर,रिकामटेकड्यांनी तृतीयपंथीयांच्या वेशात आपले कारनामे चालविल्याची चर्चा आहे. अशा वेशधारी तृतीयपंथीय बहुरुपींना कसे रोखणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.