होमपेज › Belgaon › ‘ते’ रोज करतात मृत्यूच्या दाढेतून प्रवास!

‘ते’ रोज करतात मृत्यूच्या दाढेतून प्रवास!

Published On: Jun 19 2018 1:33AM | Last Updated: Jun 18 2018 11:22PMखानापूर : वासुदेव चौगुले

पश्‍चिम भागाच्या अतिटोकावर वसलेल्या गवाळी, कोंगळा आणि पास्टोली या गावांना जोडणारा कच्चा रस्ता पावसाळ्यात भांडुरा नाल्याला पाणी आल्याने बंद झाला.  विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना चार ते पाच फूट पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. नवनिर्वाचित आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी याप्रश्‍नी लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

स्वातंत्र्यानंतर अद्याप या तिन्ही गावांना रस्ता आणि संपर्काची साधने पोहोचलेली नाहीत. वनखात्याच्या विरोधामुळे रस्त्याचा विकास आणि पुलाच्या उभारणीला अडसर निर्माण झाला आहे. याप्रश्‍नी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करुन किमान रुग्णवाहिका जाईल, इतक्या रुंदीचा रस्ता करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र अजूनही राज्य सरकार व वनविभागाचे डोळे उघडले नसल्याने यावर्षीचा पावसाळाही जनतेला बिगर रस्ता आणि पुलाविनाच काढावा लागणार आहे.

गवाळीला जाणार्‍या रस्त्यावर भांडुरा नाला आणि म्हादई नदीचे पात्र लागते. यापैकी म्हादई नदीवर नासीर बागवान यांच्या प्रयत्नातून लोखंडी पुलाची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी पूल रस्त्याला जोडल्यास यावरुन दुचाकी वाहतूक सुरु होऊ शकते. पण भांडुरा नाल्यावर अद्याप पुलाची उभारणी झाली नसल्याने ग्रामस्थांना पावसाळ्यात जीव धोक्यात घालून नदीपात्र पार करावे लागते.

दरवर्षी पावसाळा सुरु होण्यापूर्वी तिन्ही गावचे नागरिक एकत्र येऊन श्रमदानाने लाकडी साकवाची निर्मिती करतात. नाल्याच्या काठावरील झाडांचा आधार घेऊन साकवाची उभारणी केली जाते. असे असले तरी या साकवावरून मार्गक्रमण करणे शालेय मुलांसाठी धोक्याचे आहे. साकवाच्या बाजूने कोणतीही संरक्षण यंत्रणा नसते. परिणामी पाण्याचा जास्त प्रवाह असताना साकवावरून नदीपात्र पार करणे धोक्याचे ठरू शकते. यावर्षी अजूनही या ठिकाणी साकवाची निर्मिती करण्यात आलेली नाही. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहात उतरून नाला ओलांडावा लागत आहे.

तालुक्याच्या अन्य भागापेक्षा या भागात पावसाचे प्रमाण जास्त आहे. यातच दोन दिवसांपासून पावसाने जोर पकडला असून साकवाअभावी पाण्यातून प्रवास करताना ग्रामस्थांना एकमेकांचा आधार घ्यावा लागत आहे. विशेष करुन विद्यार्थी व महिलांना दवाखाना व अन्य कामांसाठी शहराकडे येत असताना धोकादायक नदी-नाला पार करून येणे जीवावर येते.

सध्या शाळांना सुरुवात झाली असल्याने या भागातील विद्यार्थ्यांनी खानापुरातील वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. मात्र अद्याप प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने विद्यार्थ्यांच्या खानापुरातील निवासाचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. यातच पुलावरुन रोज ये-जा करणे धोकादायक असल्याने शाळेमध्ये प्रवेश घेऊन विद्यार्थ्यांनी थेट आपले गाव गाठले आहे. वसतिगृह प्रवेश नक्की झाल्यानंतर हे विद्यार्थी खानापुरात दाखल होणार असल्याचे त्यांच्या पालकांनी सांगितले.

नवनिर्वाचित आ. डॉ. अंजली निंबाळकर यांचीही ग्रामस्थांनी भेट घेऊन भांडुरा नाल्यावरील पुलाबरोबरच विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत कार्यवाही हाती घेण्याची मागणी केली आहे. त्यांच्या प्रयत्नांकडे ग्रामस्थ डोळा लावून बसले आहेत.