Wed, Jul 17, 2019 20:56होमपेज › Belgaon › मराठी शाळांचे विलिनीकरण नको

मराठी शाळांचे विलिनीकरण नको

Published On: Jul 09 2018 1:01AM | Last Updated: Jul 08 2018 11:57PMबेळगाव : प्रतिनिधी

मरगळलेल्या मराठी मनामध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी म. ए. समिती एकनिष्ठ युवा आघाडी कार्यरत असून पहिल्या टप्प्यात सीमाभागातील मराठी शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले. जिल्ह्यातील काही मराठी शाळांचे विलिनीकरण करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून होत असून विलिनीकरण प्रक्रिया थांबवावी. यासाठी येत्या काळात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला.संघटनेच्या कार्यकर्त्यांची रविवारी जत्तीमठ येथे बैठक आयोजित केली होती. यावेळी उपरोक्त निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी श्रीकांत कदम होते.

कदम यांनी संघटनेची माहिती दिली. विधानसभा निवडणुकीत म. ए. समिती उमेदवारांच्या पराभवामुळे मरगळ निर्माण झाली आहे. ही मरगळ दूर करण्यासाठी युवा समितीच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत.सीमाभागात मराठी संस्कृती टिकविण्यात मराठी शाळांनी आजवर महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यामुळे या शाळा टिकल्या पाहिजे. यातूनच मराठीचे संवर्धन होते. यासाठी बेळगाव शहर, तालुका आणि खानापूर परिसरातील शाळांतील इयता पहिलीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यामध्ये 66 शाळांचा समावेश आहे.

अ‍ॅड. नितिन आनंदाचे म्हणाले, मराठी शाळा वाचविण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी प्रयत्न करण्यात येत असून पालकांनी मुलांना मराठी शाळेत दाखल करावे.सुधीर शिरोले म्हणाले, आगामी काळात मनपाच्या निवडणुका होणार आहेत. बेळगाव मनपामध्ये किमान 50 मराठी नगरसेवक निवडून आणण्याच्या दृष्टीने आतापासूनच प्रयत्न करावेत.शुभम शेळके म्हणाले, सीमाप्रश्‍नाची जागृती गावागावातून होण्याची गरज आहे. यासाठी पथनाट्याच्या माध्यमातून जागृती मोहीम हाती घ्यावी. त्याचबरोबर मराठी शाळांना मदत करण्यासाठी ठिकठिकाणी मदतपेटी ठेवावी, अशी सूचना केली. प्रत्येक मतदारसंघातील एक आदर्श शाळा निवडून त्यांना पुरस्कार द्यावा.बैठकीला साईनाथ शिरोडकर, किरण हुद्दार, अभिषेक काकतीकर, चंद्रकांत पाटील, सचिन केळवेकर, व्यंकटेश पाटील आदी उपस्थित होते.

कानडी संघटनांचा निषेध

शहरातील सार्वजनिक ठिकाणच्या पाट्या कानडीतून लावण्याची सक्ती करण्याची मागणी कानडी संघटनांकडून करण्यात येत आहे. त्यांचा या मागणीचा निषेध करण्यात आला. मराठी व्यापार्‍यांनी मराठीतील आपले फलक काढू नयेत. मराठी व्यापार्‍यांच्या बाजूने उभे राहण्याचा ठराव बैठकीत करण्यात आला.