Wed, Mar 27, 2019 06:53होमपेज › Belgaon › वर्षभर तरी धोका नाही : कुमारस्वामी

वर्षभर तरी धोका नाही : कुमारस्वामी

Published On: Jun 18 2018 1:09AM | Last Updated: Jun 17 2018 11:40PMबंगळूर : प्रतिनिधी 

राज्यातील संयुक्त सरकार कोणत्याही क्षणी कोसळेल, असे भाकित काही राजकीय निरीक्षक व्यक्त करीत आहेत. मात्र एक वर्ष तरी मला कोणी धक्का लावू शकणार नाही, असे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी  सांगितले.

आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत तरी या सरकारला कोणीही धक्‍का पोहोचवू शकणार नाही, असे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील जनतेला स्थिर सरकार देणे हे दोन्ही पक्षाचे उद्दिष्ट आहे. ते चार्टर्ड अकौंटंटस् व ऑडिटर्सच्या परिषदेमध्ये बोलत होते. 

दोन राजकीय पक्षांचे संयुक्त सरकार चालविणे हे फार मोठे आव्हान असल्याची कबूली कुमारस्वामी यांनी दिली आहे. जनतेला दिलेली आश्‍वासने पूर्ण करण्यासाठी दोन्ही पक्षांना हे सरकार चालवावेच लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. शेतकर्‍यांची कर्जे माफ करण्याची दिलेली ग्वाहीही पूर्तता करण्यामध्ये मला अडथळे येत असल्याचे कुमारस्वामी यांनी म्हटले आहे. कर्जमाफीमध्ये काही जण अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कर्जमाफी केली तर त्याचे संपूर्ण श्रेय निजदला मिळेल, याची भितीही त्यांना असल्याचे त्यांनी सांगितले. 

राज्यातील या राजकीय परिस्थितीमुळे काँग्रेस समोर खूप कमी पर्याय आहेत. त्यांना प्रादेशिक पक्षाला पाठिंबा द्यावाच लागेल व द्वितीय क्रमांकावर राहून आपली भूमिका बजावावी लागणार आहे. कर्नाटकामध्ये ज्याप्रमाणे काँग्रेस पक्ष कार्य करीत आहे. त्याप्रमाणे देशातील इतर राज्यामधूनही काँग्रेसला याप्रमाणेच तेथील प्रादेशिक पक्षाबरोबर भूमिका बजावावी लागणार आहे. या परिस्थितीचा प्रादेशिक पक्ष फायदा उचलणार हे समजूनच काँग्रेसला आपली भूमिका पार पाडावी लागणार असल्याचे राजकीय निरीक्षक हरिष रामस्वामी यांचे म्हणणे आहे.