Thu, Jul 18, 2019 08:30होमपेज › Belgaon › समाजातून सणांची उत्सुकता होतेय कमी

समाजातून सणांची उत्सुकता होतेय कमी

Published On: Aug 14 2018 1:08AM | Last Updated: Aug 13 2018 8:49PMबेळगाव : प्रतिनिधी

श्रावण म्हणजे उत्सावांना आलेला बहर. नागपंचमीला झाडाला बांधलेला झोका.. त्यावर बसून मुक्तपणे आकाशात घेतलेली झेप... गायिलेली गाणी... त्यामागोमाग येणारा भाऊ-बहिणीचे नाते अधिक वृद्धिंगत करणारा रक्षाबांधनाचा सण... शिवालयांतून दररोज घुमणारा शिवशंभोचा जयघोष... गणेश चतुर्थीचे लागलेले वेध...

यातून जनमानसात भरलेला उत्साह दिसून येतो. उत्सवाचा गंध दरवळत असतो. पावसाच्या धो..धो..कोसळणार्‍या सरीतून सणांची गाणी गायिली जातात. उत्साहाला उधाण येते. मुळात भारतीय जीवनपद्धती उत्सवी म्हणून ओळखली जाते. 

परंतु, बदलत्या जीवनशैलीचा फटका अलीकडच्या काळात सण-वारांना बसत असल्याचे दिसून येत आहे. सणवाराविषयी उत्सुकता कमी होत चालली आहे. काही वर्षांमागे सणांची चाहुल लागताच उत्साहाने फुलून येणारी मने उत्सवापासून अलिप्त राहत आहेत. सणवार घरातील वडीलधारी माणसांसाठी मर्यादित होत आहेत. 

धार्मिक विधी, रूढी, परंपरा, सणानिमित्त होणारे पाहुण्यांचे आगमन, गोडधोड पदार्थावर मारला जाणारा ताव, लहानग्यांची लगबग, मोठ्यांचा उत्साह सणांतून कमी होत चालल्याचे दिसून येत आहे. याला बदलती जीवनशैली कारणीभूत असल्याचे मत व्यक्‍त होत आहे.

व्यग्र दिनक्रम

बदलत्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाच्या दैनंदिन गरजा भरमसाट प्रमाणात वाढल्या आहेत. यातून खर्च वाढत आहे. त्याप्रमाणात मिळकतीचे स्रोत निर्माण करण्याची गरज यातून निर्माण होत आहे. यामुळे प्रत्येकजण आपल्या कामामध्ये  गुंतला जात आहे.नात्याभोवती फिरणारी जीवनशैली पैशाभोवती रिंगण घालत आहे. 

संपर्क साधनात वाढ

सणावाराची संकल्पना परस्पराशी भेटणे, बोलणे, सुख-दु:ख जाणून घेणे, मानसिक आधार देणे अशा गोष्टीतून साकार झाली. परंतु काळाच्या ओघात भौगोलिक प्रगती झपाट्याने होत आहे. नवे शोध, माहिती-तंत्रज्ञानाचा स्फोट यातून नवी संपर्क व दळणवळणाची साधने उपलब्ध झाली. एकमेकांना भेटण्यासाठी सहजगत्या वाहनांची सोय  होऊ लागली. संवाद साधण्यासाठी फोन, मोबाईल क्षेत्रात क्रांती झाली. यामुळे सणावारांचे अप्रुप कमी होत चालले. सणावाराला भेटणारे नातेवाईक दिवसातील कोणत्याही क्षणी संपर्कासाठी उपलब्ध होऊ लागले आहेत.

उत्सवी जीवनशैली

काही वर्षामागे प्रत्येकजण ठराविक साच्यात अडकून पडलेला होता. मात्र, जागतिकीकरणात अनेक बंधने गळून पडली आहेत.  उत्सवी जीवनशैली प्रत्येकाकडून अवलंबण्यात येत आहे. एकेकाळी सणावाराला कपडेलत्ते घेणारी कुटुंबे काळाच्या ओघात सापडत नाहीत. प्रत्येकाच्या आवडीनिवडी जोपासण्याकडे लक्ष देण्यात येत आहे. यातून शॉपिंग, हॉटेलिंग, पर्यटन यासारखे हौशी पर्याय सहज निवडण्यात येत आहेत.

कुटुंबे झाली लहान

आजी-आजोबा, आई-वडील, भाऊ-बहीण, मूल-मुली, चुलते-चुलती, लहान मुले यांनी भरलेले घर म्हणजे एकेकाळी गोकुळ समजण्यात येत असे. मात्र एकत्रित कुटुंबपद्धती मोडकळीस येत चालली आहे. यातून त्रिकोणी, चौकोनी कुटुंब व्यवस्था अस्तित्वात येत आहे. यामुळे सणवार साजरे करण्यातील गोडी नाहीशी होत आहे.