Mon, Jul 22, 2019 00:37होमपेज › Belgaon › मतदारयादीत आताच तपासा तुमचे नाव

मतदारयादीत आताच तपासा तुमचे नाव

Published On: Dec 02 2017 12:40AM | Last Updated: Dec 01 2017 9:03PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून यासाठी राजकीय पक्षांनी जोमाने तयारी चालविली आहे. त्याचबरोबर जिल्हा प्रशासनानेदेखील विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी कंबर कसली असून मतदारयादी दुरुस्तीचे व नवीन मतदार नोंदणीचे काम हाती घेतले आहे. यासाठी मतदारांनी सावध होण्याची गरज असून आपले नाव मतदार यादीत तपासण्याची गरज आहे.

सर्वसाधारणपणे निवडणुकीच्या धामधुमीत नेत्यांचे तर निवडणुकीदिवशी मतदारांचे लक्ष मतदार यादीकडे जाते. हे टाळण्याचे गरज आहे. विशेषत: मराठी भाषिक मतदारांची नावे गाळण्यात येत असल्याचे प्रकार दिसून येतात. हे टाळण्यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे. आपले नाव मतदार यादीत असल्याची खातरजमा केल्यास त्याला निवडणूक काळात उडणारी भंबेरी थांबण्यास मदत होणार आहे. 

जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदार संघात येत्या 6 डिसेंबरपासून मतदार नोंदणी, दुरुस्ती मोहीम सुरू होणार आहे. सदर मोहीम 21 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. याकाळात नवमतदारांना आपले नाव नोंदणी, दुरुस्ती, मतदारसंघ बदलण्याची संधी देण्यात आली आहे. त्यानंतर फेब्रुवारी 15 रोजी अंतिम मतदारयादी जिल्हा प्रशासनाकडून जाहीर होणार आहे. बेळगाव जिल्ह्यात एकूण 36 लाख 12 हजार मतदार आहेत. यामध्ये महिला मतदारांची संख्या 17 लाख 79 हजार इतकी तर पुरुष मतदारांची संख्या 18 हजार 32 हजार आहे. यामध्ये 273 इतर मतदार आहेत.

ग्रामीण भागात 1200 मतदार संख्येला एक मतदानकेंद्र तर शहरी भागात 1400 मतदार संख्येला एक मतदान केंद्र निश्‍चित करण्यात आले.त्यानुसार जिल्ह्यात 400 मतदान केंद्रांची संख्या वाढली आहे. यापूर्वी जिल्ह्यात 4040 इतकी मतदान केंद्रे होती. यामध्ये वाढ होऊन सध्या ती 4408 इतकी झाली आहे. मराठी मतदारांनी खबरदारी घेतल्यास ऐन निवडणुकीत होणारी तारांबळ टाळणे शक्य होणार आहे. निवडणूक काळात अनेक मतदारांची नावे गायब होण्याचे प्रमाण दिसून येते. त्याचबरोबर बोगस मतदारांची नोंददेखील मोठ्या प्रमाणात झालेली असते. यामध्ये काहीवेळा राजकीय षड्यंत्राचा भाग असतो. मराठी उमेदवारांचा पराभव करण्यासाठी याप्रकारची खेळी अनेकदा करण्यात येते.  हे टाळण्यासाठी  खबरदारी घेण्याची गरज आहे.