होमपेज › Belgaon › आगी लावून वृक्षसंपदेवर घाला

आगी लावून वृक्षसंपदेवर घाला

Published On: Mar 08 2018 8:42PM | Last Updated: Mar 08 2018 8:41PMबेळगाव : प्रतिनिधी

संरक्षण दलाच्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षसंपदा आहे. हा भाग नेहमीच सदाहरित दिसतो. काही दिवसांपासून या भागात वारंवार आगीच्या घटना घडत आहेत. मोठ्या प्रमाणात खुरटी झुडपे व गवत वाढले आहे. त्यामुळे अनेक लहान सहान प्राणी, पक्षी येथे वास्तव्यास आहेत. हा भाग प्राण्यांसाठी सुरक्षित होता. मात्र काही दिवसांपासून काही जणांकडून वाळलेल्या गवताला आग लावली जात आहे. यापूर्वीही वंटमुरी कॉलनीशेजारी आग लावण्यात आली होती. नागरिकांच्या सतर्कतेमुळे अग्निशमन दलाला तात्काळ सूचना देऊन आग आटोक्यात आणली होती. 
दि. 7 रोजी काही समाजकंटकांनी या भागात आग लावल्याने वनसंपदेचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक झाडे जळून खाक झाली. पक्ष्यांची घरटीही जळाली. दिवसभर लागलेल्या आगीत अनेक हिरवीगार झाडे जळाली आहेत.  

राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या या वनसंपदेला लागलेली आग चर्चेचा विषय ठरली आहे. निसर्गप्रेमींतून या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शहरात असणार्‍या संरक्षण दलामुळेच वृक्षसंपदेचे रक्षण होणे शक्य झाले आहे. माळमारुती परिसरातील संरक्षण दलाच्या राखीव जागेमुळेच या भागात हिरवळ पाहावयास मिळते. अन्यथा अनेक ठिकाणी झाडे तोडून सिमेंटच्या इमारती उभारल्याचे चित्र आहे. 

बुधवारी लागलेल्या आगीमुळे त्या भागातील हिरवळ नाहीशी झाली आहे. आगीमुळे पर्यावरण प्रदूषणही झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येते. वनससंपदेला आग लावण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. वनसंपदेला लागून असलेल्या हिंडाल्को कंपनीच्या जागेतही आगीमुळे नुकसान झाले आहे. या परिसरातही मोठ्या प्रमाणात वृक्ष संपदा असून सदर कंपनीकडे वृक्षांचे संरक्षण करण्यात आले आहे. आग लागल्याची घटना समजताच कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली. 

संरक्षण खात्याच्या राखीव जागेमध्ये लागलेली आग आटोक्यात आणण्यास अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागली. आग बुधवारी उशिरापयर्ंत धुमसत होती. परिसरातील सर्वच भागात आग लागल्याने आग आटोक्यात आणणे दलालाही शक्य झाले नाही. सायंकाळी उशिरापयर्ंत हा परिसर धुराने माखला होता. 
अशा घटना वारंवार घडत असल्याने संबंधित खात्याच्या अधिकार्‍यांनी याकडे लक्ष देऊन वृक्षसंपदेचे होणारे नुकसान टाळण्यास प्रयत्न करावेत, अशी मागणी निसर्गप्रेमी करतात.