होमपेज › Belgaon › पांगीरेत जैन मंदिरात चोरी; २३ किलो चांदीसह ४ तोळे सोने लंपास

पांगीरेत जैन मंदिरात चोरी; २३ किलो चांदीसह ४ तोळे सोने लंपास

Published On: Jan 23 2018 4:27PM | Last Updated: Jan 23 2018 4:27PMनिपाणी : पुढारी ऑनलाईन

निपाणी तालुक्‍यातील पांगीरे (ए) येथील १००८ नेमिनाथ दिगंबर जैन मंदिरात सोमवारी मध्यरात्री चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य दरवाजासह गाभार्‍याच्या दरवाजाचे कुलूप तोडून २३ किलो चांदीसह ४ तोळे सोने, असा १० लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. मंदिरातील चोरीच्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

गावच्या मध्यभागी असलेल्या या मंदिरासमोरील घरांना चोरट्यांनी बाहेरून कड्या घातल्या. त्यानंतर मंदिराचा मुख्य दरवाजा तोडला. शिवाय गाभार्‍यातील मूर्तीच्या अंगावरील चांदीची छत्री, मंगळसूत्र, नथणी असे सोण्या-चांदीचे दागिने लांबविले. दरम्यान, मंदिरासमोर राहणारे अण्‍णासो पाटील यांच्या दाराला चोरट्यांनी बाहेरून कडी लावली. पाटील यांना याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्‍न केला. पण दोन दुचाकीवरून आलेले चोरटे पसार झाले. यावेळी नेमका प्रकार लक्षात आल्याने अण्‍णा व सुंदर पाटील यांनी या घटनेची माहिती खडकलाट पोलिसांना दिली. 

या घटनेची माहिती मिळताच चिकोडीचे पोलिस उपअधीक्षक दयानंद पवार, निपाणीचे सीपीआय किशोर भरणी, फौजदार बसगौडा पाटील यांनी तातडीने घटनास्‍थळी भेट दिली. दुपारी १२ च्या सुमारास बेळगावहून आलेल्या परी या श्वानाने चोरट्याचा माग शोधला. तर ठसे तज्ञांनीही ठसे घेतले. याबाबत मंदिर समितीने दिलेल्या फिर्यादीनुसार पुढील तपास सीपीआय किशोर भरणी हे करीत आहेत.