Tue, Jul 16, 2019 14:02होमपेज › Belgaon › निपाणी श्रीनगरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

निपाणी श्रीनगरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

Published On: Jun 25 2018 1:46AM | Last Updated: Jun 24 2018 11:23PMनिपाणी : प्रतिनिधी

येथील शहराबाहेरील श्रीनगरमध्ये शनिवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. दोन बंद घरे फोडून चारचाकी वाहनासह सुमारे 20 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. नागरिकांना चाहूल लागल्यात चोरट्यांनी नगरसेवक संजय सांगावकर यांच्या दारातील दोन दुचाकी सोडून पोबारा केला.

महिनाभरात दुसर्‍यांदा चोरट्यांनी या परिसराला लक्ष केल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. श्रीनगरातील तिसर्‍या गल्लीतील रहिवासी शशिकांत आत्माराम रामाणे यांनी आपल्या मालकीची कार (एमएच 12 बीजी 4188) शेडमध्ये लावली होती. रात्री 2 ते 3 यावेळेत चोरट्यांनी ही कार  लांबविली. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा कालेखान यांच्या घराकडे वळविला.कालेखान यांच्या घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. पण चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यानंतर चोरट्यांनी पहिल्या गल्लीतील रहिवासी रावसाहेब यल्‍लाप्पा पोवार यांच्या बंगल्याकडे  मोर्चा वळविला. पोवार यांचे किराणा व जनरल स्टोअर्स दुकान आहे.

शनिवारी ते बंगल्याला कुलूप लावून ममदापूर येथे नातेवाईकांकडे गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. कॅश ड्राव्हरमधील पाच व दहा रूपये किमतीचे पाच आणि दहा हजार रुपयांचे कॉईन, दोन बेन्टेक्सचे दागिने, दुकानातील सिगारेट, बिस्कीटा व इतर साहित्य असा 15 ते 20 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. रविवारी सकाळी पोवार परत आल्यानंतर त्यांच्या ही घटना लक्षात आली. पोवार यांनी  शहर पोलिस ठाण्या घटनेची माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक अशोक चव्हाण, हवालदार एस. एस. चिकोडी यांनी पोवार, कालेखान, सांगावकर, रामाणे यांच्या घरी भेट देऊन पाहणी केली. गेल्या महिन्यात या उपनगरातील चार-पाच घरे फोडून चोरट्यांनी दागिने व रोखड लांबविली होती.