होमपेज › Belgaon › बेळगावात चोरट्यांचा धुमाकूळ

बेळगावात चोरट्यांचा धुमाकूळ

Published On: Jul 28 2018 1:32AM | Last Updated: Jul 28 2018 12:11AMबेळगाव : प्रतिनिधी

गोवावेस येथील शांतप्पाण्णा मिरजी को ऑप बँकेच्या शाखेमध्ये चोरीचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. बँकेचे समोरील शटर उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, आतील बाजूस असणार्‍या काचेच्या दरवाजामुळे चोरट्यांचा हा प्रयत्न फसला. शिवाय, शेजारी असणार्‍या प्लायवूड दुकानातही चोरीचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

अर्धवट उघडे असलेले शटर पाहून सकाळी लोकांनीच घटनेची माहिती टिळकवाडी पोलिसांना दिली. गोवावेस येथील दत्तमंदिर समोर मुख्य मार्गावर या बँकेची शाखा असून आहे. मुख्य शटरचे कुलुप तोडुन चोरट्यांनी बँकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र आतील बाजुस असणार्‍या काचेचा दरवाजा अडसर ठरल्याने त्यांचा हा डाव फसला. सदर दरवाजाही फोडण्यात आला. मात्र, चोरट्यांना आत प्रवेश करणे अशक्य ठरले. फुटलेल्या दरवाजाच्या काचा लागल्याने त्यांना येथून काढता पाय घ्यावा लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कारण घटनास्थळी रक्तही पडले आहे. 

बँकेच्या बाजुला असणार्‍या प्लायवूड दुकानात ही चोरीचा प्रयत्न करण्यात आला आहे. या दुकानाच्या शटरचे कुलुप उचकटून दुकान फोेडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. घटनास्थळी गुन्हे विभाचे  उपायुक्त महानिंग नंदगावी,  टिळकवाडी पोलिस स्थानकाचे पोलिस निरिक्षक मौनेश देशनूर यांनी भेट देउन पाहणी केली.