होमपेज › Belgaon › खानापूर रोड ओव्हरब्रिजचे काम संथगतीने

खानापूर रोड ओव्हरब्रिजचे काम संथगतीने

Published On: May 22 2018 1:16AM | Last Updated: May 21 2018 10:11PMबेळगाव : प्रतिनिधी

खानापूर रोडवरील रेल्वे ओव्हरब्रिजचे काम कासवगतीने होते आहे. नागपूर येथे तयार होत असलेल्या ब्रिजच्या गर्डरचे काम लांबल्याने हा विलंब होते आहे. यामुळे ब्रिज पूर्ण होण्यास आणखी तीन महिन्यांचा अवधी लागणार आहे. पुलाच्या मध्यभागी दोन गर्डर्स घातले जाणार असून ब्रिजचे काम संथगतीने सुरू असल्याने पर्यायी मार्गांवरील वाहतुकीचा ताण कायम आहे. 

कपिलेश्‍वर उड्डणपुलाचे काम पूर्ण केलेल्या केपीआर कन्स्ट्रक्शन कंपनीलाच  खानापूर रोडवरील रेल्वे ओव्हरब्रिजच्या कामाचा ठेका मिळालेला आहे. पुलाच्या संरक्षक कठड्यांपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. शंभरहून अधिक कामगारांकरवी काम  सुरु आहे.  गेल्या डिसेंबरअखेर पूल पूर्ण करण्याच्या अटीवर कंत्राट देण्यात आले होते. डिसेंबरच्या डेडलाईनंतर खासदार सुरेश अंगडी यांनी मार्चची डेडलाईन देऊन कोणत्याही परिस्थितीत मार्चअखेर काम पूर्ण होईल, असे आश्‍वासन दिले होते. मात्र आता मे महिना अर्धा संपला असून पुलाचे काम अर्धवटच आहे.  काम पुरेशा गतीने करण्यात येत असताना सुरक्षिततेलाही प्राधान्य द्यावे लागते. पुलासाठी लागणारे ग्रिल मिळाल्यानंतर काम अधिक गतीने होइल. डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होण्याची खात्री आहे, असे दक्षिण पशिचम रेल्वेचे कार्यकारी अभियंता  के. आर. शेट्टी यांनी सांगितले. 

एकूण चार उड्डाणपुलांची निर्मिती बेळगाव महापालिका व दक्षिण पश्‍चिम रेल्वे खात्याकडून करण्यात येणार आहे. दोन पुलांचे काम पूर्ण होऊन ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. कपिलेश्‍वर  व शिवराय उड्डाण पुलाचे काम सुरू असताना खानापूर रोडवरील पुलाचे काम हाती घेऊन तो वापरासाठी बंद करण्यात आल्यानंतर शहर भागात झालेल्या  अभूतपूर्व वाहतुक कोंडीने प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. पर्यायी व्यवस्था म्हणून खानापूर रोडवरील वाहतूक काँग्रेस रोडवर वर्ग करण्यात आली होती. वाहतूक कोंडीची दखल प्रशासनाला घ्यावीच लागली.  पोलिसांचा मोठा फौजफाटा केवळ रहदारी नियंत्रणासाठी तैनात करावा लागला होता.