Tue, Apr 23, 2019 01:35होमपेज › Belgaon › बोरगावमध्ये महिलेचा खून

बोरगावमध्ये महिलेचा खून

Published On: Aug 13 2018 1:20AM | Last Updated: Aug 12 2018 10:32PMनिपाणी : प्रतिनिधी

बोरगाव-इचलकरंजी रस्त्यावरील माळभागावर महिलेचा खून केल्याची घटना  रविवारी सकाळी उघडकीस आली. दिशा दिनेश पाटील (वय 35, रा. कवठेमहांकाळ, जि. सांगली) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

खून झालेल्या महिलेच्या अंगावर जिन्स पॅन्ट व टॉप आढळून आला. तिच्या पर्समध्ये सापडलेल्या जन्मकुंडली व विविध कागदपत्रांवरून तिची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे.  गळा दाबून तिचा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्‍त केला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 

दिशा पाटील हिचा महाराष्ट्रात खून करून कर्नाटक हद्दीत मृतदेह आणून टाकल्याचा संशयही व्यक्‍त करण्यात  येत आहे. चिकोडीचे प्रभारी उपअधीक्षक डी. टी. प्रभू यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.दिशा पाटीलचे मूळ गाव कवठेमहांकाळ असून तिचा 12 वर्षांपूर्वी इचलकरंजी येथील दिनेश पाटील याच्याशी विवाह झाला होता. घटनास्थळी श्‍वानपथकाला पाचारण करण्यात आले होते; पण श्‍वानपथक घटनास्थळीच घुटमळले. ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते.

सदलगा पोलिस ठाण्याचे  उपनिरीक्षक संगमेश दिडगिनहाळ व सहकार्‍यांनी पंचनामा केला. दिशा पाटील हिचे वडील आण्णाप्पा कोठावळे (रा. कवठेमहांकाळ) यांनी सदलगा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.  दिनेश पाटील याला ताब्यात घेण्यासाठी पोलिस रवाना झाले. चिकोडी सरकारी रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दिशा पाटील 12 वर्षाचा एक मुलगा आहे. अधिक तपासासाठी पोलिस पथक कवठेमहांकाळकडे रवाना झाले आहे. सीपीआय मलगोंडा नायकर व सहकारी अधिक तपास करत आहेत.