Mon, May 20, 2019 11:09होमपेज › Belgaon › सांगा ‘वसंत’ कुणी हा पाहिला...!

सांगा ‘वसंत’ कुणी हा पाहिला...!

Published On: Mar 14 2018 12:52AM | Last Updated: Mar 13 2018 11:03PMबेळगाव : प्रतिनिधी


‘आला वसंत, वसंत आला। तनामनाचा
 झाला हिंदोळा। हिरवे सारे रंग दुलारे।
कोकीळ गाणे, निळ्यात भरे। कोर्‍या 
फांदीला, धूंद कोवळी। आला वसंत, 
वसंत आला। तनामनाचा झाला हिंदोळा।

 

अशा काव्यपक्‍तिने वसंत ऋतुचे सुंदर वर्णन अधोरेखित होते. मनाला नवी ऊर्जा, नवचैतन्य देणार्‍या वसंत ऋतुच्या आगमनाने सारी सृष्टी नव्या नवलाईने नटली जात आहे.
हिवाळ्यातली हाडं गोठवून टाकणारी थंडी संपता संपता आता ऊन तापू लागले आणि रानात पळस पेटले की समजायचं की थंडीचे पानगळीचे दिवस जाऊन नवे साज घेऊन चैत्रपालवी लवलवण्याचे दिवस, आंब्याला लगडलेल्या बाळकैर्‍या मोठ्यांची नजर चुकवून घसा धरेपर्यंत खाण्याचे दिवस, सगळे कसे नवे नवे! ऋुतुंच्या या स्थित्यंतराच्या उंबरठ्यावरचा रंगीत उत्सव म्हणजे वसंतोत्सव! मधूनच कोकीळेचा कुहू कुहू चा गुंजारव कानी पडू लागला असून वसंत ऋतुच्या आगमनाची चाहूल तनामनाला स्पर्शून जात आहे. 

वसंतोत्सव म्हणजे निसर्गाचा उत्सव. निसर्ग एरवीही सुंदर असतोच.  पण वसंतात त्याचे रुप काही औरच असते. आपल्या जीवनातही तारुण्य हा वसंत ऋतुच असतो. त्याचप्रमाणे ‘वसंत’ही निसर्गाची युवावस्था आहे.निसर्गाचे एरवी आकर्षण असतेच. पण वसंत ऋतुत त्याचे सौंदर्य जास्त खुलतं. त्यामुळे मानवी मनावर त्याचा असा काही असर होती की, सगळी दु:खे, वेदना पार विसरायला होतात व वसंताच्या स्पर्शाने सृष्टी फुलून निघते.

पृथ्वीवर नवेपणा, ताजेपणा आणून सर्वांना हषंभरीत, उल्हासित करणारा हा ऋतु — शुद्ध आनंदाचे प्रतिक मानले जाते. आता वसंत बहरायला लागलाय. पहाटेच्यावेळी कोकीळेचे कुहू कुहू गुंजारव कानी पडू लागले आहेत. वसंत आला, वसंत आला अशी जणू जाणीवच करून देताहेत. जागोजागी पानगळ झडून वृक्ष फुलांनी बहरून येत आहेत. रस्त्याच्या कडेला लाल, पिवळ्या रंगांच्या आणि गुलाबी छटा असलेल्या फुलांची झाडे आकर्षित करून घेत आहेत. जिकडे पहावे तितके लतावेलींना बहर आला असून निसर्गात तजेला दिमाखात भरून राहिला आहे.

वसंत हा सहा ऋुतुतील सुंदर ऋतु मानला जातो. वसंतात जिकडे तिकडे झाडांना नवी पालवी फुटलेली दिसत आहे. तर असा हा वसंत! नव्या नाजूक पालवीने पोपटी, हिरवा पळस — पांगार्‍याच्या गुलमोहरी फुलोर्‍याने लालकेशरी दिसणार्‍या सोनचाफ्याच्या फुलांनी सोनेरी झालेला मोगरा, मदनबाण, सुरंगी व बकुळीने गंधीत झालेला वसंत तनामनाला स्पर्शून जातो. पाना—फुलांनी बहरून आलेले वृक्ष आणि लतावेलींमुळे उन्हाच्या तडाख्यात मनाला गारवा मिळत आहे.