होमपेज › Belgaon › खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील अनेक गावांची शोकांतिका : अर्ज, विनंत्या करूनही प्रशासन ढिम्मच

रस्ता - साकवही नाही; केवळ आश्‍वासनेच

Published On: Jun 23 2018 1:20AM | Last Updated: Jun 22 2018 10:49PMखानापूर : राजू कुंभार

स्वातंत्र्याच्या 70वर्षानंतरही तालुक्यातील  पश्‍चिम भाग मुलभूत सुविधांपासून वंचित आहे. उन्हाळा आणि हिवाळ्यात या भागातील नागरिक कोणत्याही समस्येला जुमानत नाहीत, पण पावसाळ्यात मात्र त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. आधुनिक युगातही त्यांना नरकयातना भोगाव्या लागत असून शासनाकडून मात्र त्यांची कधीच दखल घेतली जात नाही. प्रामुख्याने सस्ता आणि पुलांची समस्या गंभीर आहे.  गवाळी, पास्टोली, मेंढील, कोंगळा, मांगीनहाळ, आमगाव, जामगाव, कबनाळी आदी गावांतील नागरिकांना मरणयातना सोसाव्या लागतात.

पाच वर्षापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी भीमगड अभयारण्य परिसराचा  भर पावसात दौरा केला होता. आ. अरविंद पाटील आणि तत्कालीन तहसीलदार सी. डी. गीता यांनीही या भागाचा दौरा करून तेथील समस्यांची पाहणी केली होती. नागरिकांवर आश्‍वासनांचा अक्षरश: पाऊस पाडण्यात आला होता. मात्र पाच  वर्षे उलटली तरी आश्‍वासनपूर्ती झाली नाही. विद्यमान आ.डॉ.अंजली निंबाळकरांच्या सूचनेवरुन सध्या तालुका प्रशासन जागे झाले असून साकव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.

नागरिकांनी  गेल्या दोन-तीन दशकात हजारो अर्ज आणि निवेदने देऊन झाली तरी पश्‍चिम भागातील एकाही गावाच्या मार्गावरील नदी-नाल्यावर पुलाची सोय करण्यात आलेली नाही. काही गावांना तर अद्याप रस्ताच नाही. पावसाचे चार महिने या गावांना बेटांचे स्वरूप येते. शहर आणि परिसराशी त्यांचा संपर्क तुटतो. 

दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर मागण्या, अर्ज आणि विनंत्या केल्या जातात. पण केवळ आश्‍वासनांचा पाऊस पडतो. या भागातील लोकांचा राजकारण्यांच्या आश्‍वासनांवर कधीच विश्‍वास नव्हता; पण प्रथमच जिल्हाधिकार्‍यांनी पाहणी केल्यानंतर त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. शासकीय यंत्रणादेखील दरवर्षीप्रमाणेच  सर्वेक्षणाची टूम काढून या भागातील समस्यांचे फोटोसेशन करतात. परिणामी आश्‍वासनांचा महापूर आला तरी त्यांच्या पूर्ततेचा दुष्काळ मात्र कायम आहे. 

सध्या ता. पं. कार्यनिर्वाहक अधिकारी प्रवीण कट्टी यांनी पास्टोली, कोंगळा, गवाळी आदी भागात पाहणी  केली आहे. आ.निंबाळकर याच्या सुचनेवरुन पक्के साकव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. डॉ.निंबाळकरांच्या प्रयत्नांकडे जनतेचे लक्ष लागून असून यंदातरी पक्के साकव मिळतील का, असा प्रश्‍न नागरिकांतून उपस्थित होत आहे.

संपर्क तुटल्याने समस्यात वाढ

गावांना रस्ते नाही, नदी नाल्यांवर साकव नाहीत. शहर आणि इतर गावांशी संपर्क तुटत असल्याने गावातल्या गावात उसनवारी करून उदरनिर्वाह चालवावा लागतो. आरोग्य व्यवस्थेची बोंब आहे.परिणामी एखाद्या रोगाची साथ आल्यानंतरदेखील तेथे उपचार होत नाहीत. शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांची वाताहत होत आहे.