Mon, Aug 19, 2019 13:21होमपेज › Belgaon › शिवपुतळा उभारणीचा मार्ग अखेर मोकळा

शिवपुतळा उभारणीचा मार्ग अखेर मोकळा

Published On: Apr 11 2018 1:34AM | Last Updated: Apr 11 2018 1:32AMबेळगाव : प्रतिनिधी

बस्तवाड-हालगा (ता. बेळगाव) येथे  छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्याबाबतची स्थगिती मंगळवारी न्यायालयाने उठवली. त्यामुळे शिवपुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बस्तवाड येथे शिवपुतळा उभारणीसाठी काही महिन्यांपासून ग्रामस्थांनी वर्गणी जमा केली होती. त्याचबरोबर एका पक्षाच्या माध्यमातून पुतळ्याचा खर्च देण्यात आला होता. त्यानुसार 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती दिवशीचे औचित्य साधून  शिवपुतळा उभारण्यात येणार होता. त्यादिवशी जय्यत तयारीही झाली होती. पुतळाही बेळगावहून बस्तवाडला नेण्यात आला होता. मात्र,  गावातील एका समाजाने आक्षेप घेत न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.  पुतळ्याची प्रस्तावित जागा ग्रामपंचायतच्या मालकीची असून तेथे दुसरा एक पुतळा उभारण्यात येणार आहे. 

त्यामुळे शिवपुतळा उभारण्यात येऊ नये, अशी भूमिका या समाजाने घेतली होती. त्यानुसार न्यायालयाने पुतळा उभारणीला स्थगिती दिली होती.  मंगळवारी न्यायालयात ग्रामस्थांनी मांडलेल्या युक्‍तिवादामुळे चतुर्थ कनिष्ठ अतिरिक्‍त दिवाणी न्यायालयाने  स्थगिती उठविण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे बस्तवाड ग्रामस्थांनी व तालुक्यातील शिवप्रेमीनी समाधान व्यक्‍त केले.  न्यायालयात अ‍ॅड. सुधीर चव्हाण, अ‍ॅड. अनिल सांबरेकर, अ‍ॅड. सोमनाथ जायाण्णाचे यांनी बाजू मांडली. लवकरच पुतळा उभारण्यात येणार आहे. 
Tags :The way to build the Shivpupala is finally freed