Mon, Apr 22, 2019 03:57होमपेज › Belgaon › डिजिलॉकरबद्दल वाहतूक पोलिसच अनभिज्ञ

डिजिलॉकरबद्दल वाहतूक पोलिसच अनभिज्ञ

Published On: Jun 30 2018 1:15AM | Last Updated: Jun 29 2018 8:37PMबेळगाव : प्रतिनिधी

पावसाळ्यात महत्त्वाची कागदपत्रे जवळ बाळगणे म्हणजे मोठी कसरत करावी लागते. मात्र, डिजिटल युगात यावरही उपाय असून तुमच्या स्मार्टफोनमध्ये तुम्ही कागदपत्रे ठेऊ शकता. डिजिटल लॉकरच्या माध्यमातून नागरिकांना सॉफ्ट कॉपी स्वरुपात कागदपत्रे हाताळण्याची सोय केंद्र सरकारने उपलब्ध करून दिली आहे. मात्र, बेळगाव वाहतूक पोलिसांना यासंबंधीची कोणतीच माहिती नसल्याने वाहनधारकांना समस्या निर्माण होत आहे.

डिजिटल लॉकरमध्ये 2006 पासूनचे लायसेन्स, आरसीबुक ठेवू शकतो. शासनाच्या परिपत्रकानुसार वाहन अडविल्यास डिजिलॉकरमधील कागदपत्रे पोलिसांना दाखविणे पुरेसे आहे. मात्र, त्याबद्दल वाहतूक पोलिसानांच पुरेशी माहिती नाही. विशेष म्हणजे ही कागदपत्रे त्या त्या विभागातून तुम्हाला थेट डाऊनलोड करता येतात. त्यासाठी डिजिटल लॉकर हे अ‍ॅप डाऊनलोड करणे गरजेचे आहे. डिजिलॉकर हे केंद्रीय माहिती तंत्रज्ञान विभागाशी जोडले गेले असल्याने अ‍ॅपवरील कागदपत्रे ग्राह्य धरली जावीत, अशा सूचना केंद्रीय माहिती तंत्रज्ञान विभागाने दिल्या आहेत. मात्र, वाहतूक पोलिसांबाबत यामध्ये जागृती नसल्याने तेच संभ्रमात आहेत. एखाद्या वाहनचालकाने डिजिलॉकरमधील लायसन्स दाखविल्यानंतर ते ग्राह्य धरायचे की नाही, याबाबत वाहतूक पोलिस अनभिज्ञ आहेत. 
वाहनचालकही अनभिज्ञच : केंद्र सरकारने डिजिलॉकरला मान्यता दिली असली तरी शहरातील वाहनधारकांना याबद्दल कल्पना नाही.

अशी करा कागदपत्रे सेव्ह

डिजिलॉकर अ‍ॅपमध्ये जाऊन आधारकार्ड लिंक दिल्यानंतर कर्नाटक डिपार्टमेंट ऑफ ट्रान्सपोर्ट कर्नाटक या लिंकवर क्‍लिक करून आपण ड्रायव्हिंग लायसन्स, एमिशन सर्टिफिकेट, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ही कागदपत्रे डाऊनलोड करून सेव्ह करून ठेऊ शकतो. ही कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार आहेत.

काय आहे डिजिलॉकर 

आपली अधिकृृत कागदपत्रे डिजिटल स्वरुपात सेव्ह करून ठेवण्यासाठी  केंद्र सरकारने डिजिलॉकर सुरु केले आहे. आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड ही महत्त्वाची कागदपत्रे यामध्ये ठेवता येतात.