Mon, May 27, 2019 08:51होमपेज › Belgaon › ‘भुयारी’ बनला दुर्गंधीचा मार्ग

‘भुयारी’ बनला दुर्गंधीचा मार्ग

Published On: Jul 12 2018 1:40AM | Last Updated: Jul 11 2018 10:15PMबेळगाव (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर न्यायालय आवारात जाण्यासाठी उभारण्यात आलेला भुयारी मार्ग सध्या दुर्गंधीचे केंद्र बनला आहे. या ठिकाणी पाणी, घाण साचून त्यातून दुर्गंधी पसरत आहे. यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. डासांची उत्पत्ती झपाट्याने होत असून रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर न्यायालयीन आवारातून ये-जा करण्यासाठी भुयारी मार्गाची उभारणी केलेली आहे. परंतु, यामध्ये मानापमान नाट्य घडल्यामुळे वकिलांनी सदर मार्गावर मागील अनेक वर्षांपासून बहिष्कार घातला आहे. यामुळे हा मार्ग सध्या अडगळीत पडला असून पावसाचे पाणी साचले आहे. त्यामध्ये घाण पडून ते कुजत आहे. यातून दुर्गंधी फैलावत होत आहे.प्रशासनाने लाखो रुपये खर्चून हा मार्ग सुरू केला आहे. याचा वापर वाहतुकीसाठी होईल, असा उद्देश ठेवण्यात आला होता. मात्र प्रशासन आणि वकील यांच्यामध्ये मानापमान नाट्य घडले. यातून वकिलांनी या मार्गावर बहिष्कार घातला असून सध्या हा मार्ग निरुपयोगी ठरला आहे.

हा परिसर नेहमी गजबजलेला असतो. जिल्हाधिकारी व न्यायालयीन कामकाजासाठी येणार्‍या नागरिकांची सतत वर्दळ असते. निवेदने, आंदोलने, सरकारी कामकाजासाठी येणार्‍यांची या ठिकाणी गर्दी असते. त्यांच्याकडून या मार्गाचा काही वेळा वापर करण्यात येतो. मात्र सध्या घाणीचे साम्राज्य पसरले आहे.प्रशासनाने या ठिकाणी असणारी घाण त्वरित हटविण्याची गरज आहे. अन्यथा निर्माण झालेल्या दुर्गंधीतून आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने स्वच्छता करणे अत्यावश्यक आहे. वापराविना पडून असलेल्या मार्गात अनेक जणांकडून घाण, कचरा टाकण्यात येतो. तो तसाच पडून राहिल्याने त्यामध्ये पावसाचे पाणी मिसळून दुर्गंधी पसरत आहे. ही डोकेदुखी नागरिकांना सहन करावी लागत आहे.

प्रशासनाची डोळेझाक

सध्या शहरात घाणीमुळे रोगराई पसरली आहे. डेंग्यू, चिकनगुनियाचे रुग्ण वाढत आहेत. यामुळे स्वच्छतेची सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिली आहे. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच दुर्गंधी पसरली आहे. त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. प्रशासनाचा कारभार म्हणजे ‘दिव्याखाली अंधार’ आहे.