Sun, Apr 21, 2019 06:26होमपेज › Belgaon › भ्रष्टाचार रोखण्याची ताकद विद्यार्थ्यांमध्ये

भ्रष्टाचार रोखण्याची ताकद विद्यार्थ्यांमध्ये

Published On: Jan 07 2018 2:01AM | Last Updated: Jan 06 2018 11:06PM

बुकमार्क करा
निपाणी : प्रतिनिधी

देशात वाढलेला भ्रष्टाचार रोखण्याची ताकद विद्यार्थी व युवकांमध्ये आहे. आयुष्यभर भ्रष्टाचारमुक्त देशासाठी कार्यरत आहे. त्याला देशातील सर्व स्तरातील नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे. युवकांनी नोकरी, व्यवसायाबरोबरच देशसेवेची भावना ठेवून निरंतर कार्यरत राहावे, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. म्युनिसिपल हायस्कूलजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्तंभास शनिवारी सकाळी 10 वाजता त्यांनी भेट दिली. त्यावेळी विद्यार्थी व युवकांना उद्देशून ते बोलत होते.

हजारे म्हणाले, डॉ. बाबासाहेब  आंबेडकरांच्या स्वप्नातील माणूस होण्यासाठी प्रत्येकाने शिक्षण घेतले पाहिजे. शिक्षणामुळेच माणूस मोठा होतो. पण बंगला, गाडी, ऐशोआराम करून जीवनाचे दर्शन घडविण्यापेक्षा प्रामाणिकपणे कार्यरत राहून देशाची शान वाढवावी. देशसेवा केल्याने जीवन गतिमान बनते, हे सूत्र युवकांनी समोर ठेवून कार्यरत झाले पाहिजे. देशसेवा करण्यास मर्यादा येण्याच्या भीतीने आपण घरदार सोडले. मंदिरात राहून देशसेवा करीत आहोत. दिल्लीत 23 मार्च रोजी जनआंदोलन करणार आहे. निपाणीसह परिसरातील तरुणांनी त्यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

हजारे यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर स्तंभास पुष्पहार अर्पण करण्यात आला. नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी स्वागत केले. कार्यक्रमास माजी आ. काकासाहेब पाटील, प्रा. सुभाष जोशी, उपनगराध्यक्ष सुनील पाटील, नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार, राजेंद्र चव्हाण, राजकुमार सावंत, विजय मेत्राणी, प्रताप मेत्राणी, मोहन बुडके, प्रवीण भाटले, चंद्रकांत कोठीवाले, विठ्ठल वाघमोडे, पी. जे. नरके, विविध क्षेत्रातील मान्यवर, युवक, विद्यार्थी उपस्थित होते.