होमपेज › Belgaon › प्रचार चढता, पारा वाढता : लक्ष प्रियांक, गुत्तेदारांवर

प्रचार चढता, पारा वाढता : लक्ष प्रियांक, गुत्तेदारांवर

Published On: Apr 30 2018 1:42AM | Last Updated: Apr 29 2018 11:33PMगुलबर्गा : गुरय्या रे स्वामी

हैदराबाद-कर्नाटकचे विभागीय केंद्र म्हणून ओळखल्या जाणार्‍या गुलबर्गा जिल्ह्यात वाढत्या उन्हाबरोबर निवडणुकीचे वातावरणही तापत चालले आहे. तापमान 43 वर पोहोचत असताना प्रचाराचा पाराही वाढला आहे. लोकसभेतील काँग्रेस पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि माजी मुख्यमंत्री दिवंगत वीरेंद्र पाटील आणि दिवंगत धरमसिंग याचा हा जिल्हा.जिल्ह्यात खर्गे यांचा राजकीय दबदबा अद्यापही कायम आहे. 

यंदाच्या निवडणुकीत खर्गे यांच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी भाजप जंगजंग पछाडत आहे. काँग्रेसचे सात आमदार विरुद्ध भाजपचा एक आणि कजपचा एक हे चित्र उलटे करण्यासाठी भाजप शक्य ते सारे प्रयत्न करत आहे. चितापूर हा या जिल्ह्यातला सर्वाधिक चुरशीचा मतदारसंघ. मल्लिकार्जुन खर्गे यांचे सुपुत्र पर्यटन मंत्री प्रियांक खर्गे पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरले असून भाजपचे वाल्मिकी नाईक यांच्याशी त्यांचा सामना आहे. निजदने येथे उमेदवार दिलेला नाही. 

जेवरगीमधून माजी मुख्यमंत्री धरमसिंग यांचे सुपुत्र काँग्रेस उमेदवार डॉ. अजयसिंग लढत आहेत. त्यांची भाजपचे जिल्हाध्यक्ष दोड्डप्पा गौडा-पाटील यांच्याशी होणारी लढत लक्षवेधी आहे. इथून निजदचे केदारलिंगय्या हिरेमठ यांचीही उमेदवारी महत्त्वाची ठरणार आहे.  शिवसेनेतर्फे प्रवीणकुमार यांना उमेदवारी देण्यात आली असून, भाजपच्या मतविभागणीस कारणीभूत ठरल्यास आश्‍चर्य नाही.
अफजलपूर हा जेवरगीनंतरचा सर्वाधिक चुरशीचा मतदारसंघ. इथून माजी मंत्री भाजपचे मल्लिकय्या गुत्तेदार व काँग्रेसचे एम. वाय. पाटील लढत आहेत. गुत्तेदार  भाजपमध्ये गेल्यानंतर भाजपचे एम. वाय. पाटील काँग्रेसमध्ये दाखल झाले. ही देवाण-घेवाण कुणासाठी फलदायी ठरेल, हे येणारा काळ ठरवेल.

गुलबर्गा ग्रामीण मतदारसंघात भाजपने यंदा रेवू नाईक बेळमगी यांना वगळून बसवराज मत्तिमोड यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या बेळमगी यांनी निजदतर्फे उमेदवारी दाखल केली आहे, तर काँग्रेसतर्फे आमदार जी. रामकृष्ण यांचे चिरंजीव विजयकुमार लढत आहेत. 

गुलबर्गा उत्तरमध्ये दिवंगत  मंत्री कमरूल इस्लाम यांच्या पत्नी कनिज फातिमा बेगम यांना काँग्रेसने उमेदवारी दिली असून, मुस्लिम बहुल असलेल्या या मतदार संघात चंद्रकांत बी. पाटील यांची कसोटी आहे. या व्यतिरिक्त उर्वरित तीन मतदारसंघांतही काही प्रमाणात चुरशीच्या लढती होतील. मात्र, सर्वाधिक लक्ष असेल ते प्रियांक खर्गे आणि मल्लिकय्या गुत्तेदार यांच्याकडेच.