Tue, May 21, 2019 23:00होमपेज › Belgaon › खानापूर रोड रेल्वे उड्डाणपूल कामाला गती

खानापूर रोड रेल्वे उड्डाणपूल कामाला गती

Published On: Apr 18 2018 12:47AM | Last Updated: Apr 17 2018 10:58PMबेळगाव : प्रतिनिधी

खानापूर रोड येथील रेल्वे उड्डाणपुलावर स्टील गर्डर घालण्याच्या उद्देशाने रेल्वेलाईनच्या दोन्ही बाजूंनी जोरदार तयारी केली जात आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतर स्टील गर्डर घातले जाणार आहेत. स्टील गर्डर तयार करण्याचे काम बंगळूर येथील एका कंपनीला देण्यात आले आहे. 

 

या कामाव्यतिरिक्त रेल्वे उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंनी संरक्षक भिंती बांधण्याच्या कामालाही चालना देण्यात आली आहे. राज्य वनखात्याने त्या ठिकाणी उड्डाणपुलासाठी अडथळा ठरणारे वृक्ष तोडण्यास यापूर्वीच संमती दिली आहे. त्या संमतीनुसार पुलाच्या बांधकामात अडथळा ठरणारे वृक्ष तोडण्यात आले आहेत. या उड्डाणपुलाचे बांधकाम जोरदार सुरू असले तरी ते पूर्ण करण्यासाठी अद्याप सहा महिन्यांचा कालावधी लागेल, असे रेल्वे खात्याच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. हा रेल्वे उड्डाणपूल बेळगाव दक्षिण व बेळगाव उत्तर शहराला जोडणारा प्रमुख मार्ग आहे. त्याशिवाय बेळगाव, गोवा या राष्ट्रीय महामार्गाशी जोडलेला हा रस्ता असल्याने हा रेल्वे उड्डाणपूल तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे. 

या पुलाचे बांधकाम सुरू असल्यामुळे वडगाव, शहापूर येथील बस व रिक्षा सेवेला काँग्रेस रोडमार्गे जाऊन गोवावेसने पुढे जावे लागत आहे. त्यामुळे अंतर वाढलेले असल्याने नागरिकांचा वेळ व पैसा खर्च होत आहे. सेकंड रेल्वेगेटच्या ठिकाणी रेल्वे गेट पडल्यानंतर वाहतुकीची कोंडी होत आहे. ही कोंडी उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतरच दूर होणार आहे. कपिलेश्‍वर रेल्वे उड्डाणपुलाबरोबरच जुना धारवाड रोड येथील शिवराय रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाल्याने तो पूल अखेर नागरिकांनीच वाहतुकीसाठी सुरू केला आहे. त्यामुळे बेळगाव शहरातील रहदारीची कोंडी काही प्रमाणात दूर झाली आहे. बेळगाव शहरातील वाहनचालक, बसचालक व नागरिक खानापूर रेल्वे उड्डाणपूल पूर्ण कधी होणार, या प्रतीक्षेत आहेत.
Tags :  speed, work , Khanapur, Railway Bridge,belgaon news