Tue, Apr 23, 2019 02:13होमपेज › Belgaon › युवा मेळाव्याच्या जागृतीला वेग

युवा मेळाव्याच्या जागृतीला वेग

Published On: Jan 09 2018 1:32AM | Last Updated: Jan 08 2018 10:18PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने शुक्रवार दि. 12 रोजी युवा मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात बार्शी येथील शिवअभ्यासक युवा वक्ते खंडू डोईफोडे सहभागी होणार असून ते शिवचरित्रावर मार्गदर्शन करणार आहेत. युवा मेळाव्याच्या जागृतीला येत्या काळात वेग येणार असून मेळाव्यात युवकांबरोबर महिलादेखील मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

तालुका म. ए. समितीकडून मागील चार वर्षापासून युवादिनाचे औचित्य साधून मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वीचे कार्यक्रम शहरात घेण्यात आले. यावर्षी प्रथमच तालुक्यातील बेनकन्नहळ्ळी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्याची तयारी जोमाने चालविण्यात आली आहे.

12 जानेवारी हा युवादिन म्हणून साजरा करण्यात येतो. याचदिवशी राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती आहे. यामुळे ही जयंतीदेखील साजरी करण्यात येणार आहे. यावेळी शिवचरित्र व सीमालढा याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

शिवचरित्रावर खंडू डोईफोडे मार्गदर्शन करणार आहेत. त्यांची युवकामध्ये क्रेझ आहे. कमी वयाचा हा वक्ता युवकांना आकर्षित करण्यात माहीर आहे. यामुळे त्यांच्याविषयी युवकांमध्ये आकर्षण असून त्यांचे वक्तृत्व ऐकण्यासाठी युवकांची गर्दी होणार आहे. सीमाप्रश्‍नाचा इतिहास व आताची न्यायालयीन स्थिती यावर महाराष्ट्राचे माजी सहकार निबंधक सीमाखटल्यातील महत्त्वपूर्ण साक्षीदार दिनेश ओऊळकर युवकांना मार्गदर्शन करणार आहेत. ते अभ्यासू वक्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाखटल्यात त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. 

मेळावा बेनकनहळ्ळी येथील मराठी शाळेनजीक होणार आहे. यासाठी रविवारी जागेची पाहणी करण्यात आली. यावेळी म. ए. समितीचे कार्याध्यक्ष माजी आ. मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, युवा आघाडी अध्यक्ष अ‍ॅड. शाम पाटील, उपाध्यक्ष दत्ता उघाडे, राजू किणेकर, विलास देवगेकर, अनंत पाटील, रामा पाटील, सचिन दळवी, केदारी कणबरकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

मेळाव्याच्या तयारीसाठी युवा आघाडीच्या माध्यमातून तालुक्यात जागृती मोहीम हाती घेण्यात येणार असून अधिकाधिक युवकांची उपस्थिती राहील याबाबत जागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. मेळाव्यात राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात येणार आहे. यामुळे महिलांनीदेखील मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवावी, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येणार आहेत. मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा युवा आघाडी कार्यरत झाली असून युवकांना संघटित करण्यात येणार आहे. म. ए. समितीच्या संघटनेमध्ये अधिकाधिक युवकांचा सहभाग वाढावा यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. या माध्यमातून युवकांमध्ये पुन्हा एकदा सीमाप्रश्‍नी जागर घडविण्यात येणार आहे. यासाठी तालुक्यातील तरुणाई सज्ज झाली आहे. 

तालुक्यातील युवकांमध्ये सीमाप्रश्‍न व शिवचरित्राचा जागर व्हावा, यासाठी मागील चार वर्षापासून युवादिन साजरा करण्यात येत आहे. यावर्षी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून यासाठी जागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

- दत्ता उघाडे, उपाध्यक्ष तालुका म. ए. समिती युवा आघाडी